मोबाइल चोरट्याचा कारनामा, आरोपी अटकेत
कल्याण । नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार्या पोलिसांवर हल्ल्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. मोठ्या शिताफीने सापळा रचत पकडण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याने चक्क पोलीस अधिकार्याला शिवीगाळ करत त्याच्या हातावर काचेच्या तुकडयाने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी लतीफ शेख विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
कल्याण पश्चिमेकडील बाजारपेठ पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत पवार यांना काल रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास वल्लीपिर परिसरात एक इसम चोरीचा मोबाईल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पवार यांनी आपल्या सहकार्यांसह वल्लीपिर चौकीजवळ सापळा रचला. काही वेळाने लतीफ शेख नावाचा इसम त्या ठिकाणी आला.
पवार यांना संशय आल्याने त्यांनी लतीफला हटकले व त्याची चौकशी सुरू केली. क्षणार्धात लतीफने स्वतःचे डोके खिडकीच्या काचेवर आपटले व तुटलेल्या काचेने पवार यांच्या हातावर वार केले तसेच स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतले. यांनतर पवार यांच्या सहकार्यांनी लतिफला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कर्तव्य बजावत असताना पोलिसांवर होणार्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून ही बाब चिंतेचा विषय बनली आहे.