चोरट्याने वृध्द महिलेची पोत लांबविली

0

जळगाव। शिवकॉलनी परिसरातील शंभरफुटी रस्त्याकडे जाणार्‍या मोकळ्या जागेतून फिरण्यासाठी जात असलेल्या वृध्द महिलेचा पाठलाग करून एका चोरट्याने गळ्यातून 10 ग्रँमची पोत हिसकावून पळ काढल्याची घटना सोमवारी सकाळी 6.52 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वृध्द महिलेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी लागलीच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून चोरटा वृध्द महिलेचा पाठलाग करतांना दिसून आला आहे.

शिवकॉलनी येथील कृष्णा मेडीकलच्या शेजारी लिलाबाई रामदास पाटील (वय-75) या वृध्द महिला कुटूंबियांसोबत राहताता. त्यांना मधुमेह (डायबिटीस) असल्यामुळे त्या नेहमी सकाळी घराजवळ असलेल्या शंभरफुटी रस्त्याकडे जाणार्‍या मोकळ्या जागेत फिरण्यासाठी जातात. त्यामुळे वृध्द महिला लिलाबाई पाटील ह्या सोमवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घरातून फिरण्यासाठी घराबाहेर पडल्या. घराजवळच्या मोकळ्या जागेतून शंभरफुटी रस्त्याकडे सकाळी 6.52 जात असतांना एका तरूणाने त्यांना हाक मारली. वृध्द महिलेने मागे वळून पाहिले. त्यानंतर त्या पुन्हा त्यांच्या मार्गस्त झाल्या. यानंतर त्या तरूणाने वृध्द महिलेचा काही अंतरापर्यत पाठलाग करून गळ्यातील दोन सोन्याच्या पोता हिसकावल्या आणि पळण्याचा प्रयत्न केला. वृध्द महिलेने लागलीच त्यांला पकडले मात्र तो हातातून निसटला.

हिसका देत पळाला
मंगळपोत हिसकावल्यानंतर चोरटा हिसका देवून पळण्याचा प्रयत्न करीत असतांना वृध्द महिलेने मोठ्या हिंमतीने चोरट्या तरूणाला पकडले. यानंतर वृध्द महिला लिलाबाई पाटील यांनी त्याच्या हाताला हिसका देवून पोत ओढण्याचा प्रयत्न केला. परंतू, चोरट्याने त्यांना जोरात हिसका देत 10 ग्रँमची सोन्याची पोत चोरून नेली. यानंतर लिलाबाई यांनी आरडा-ओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. दरम्यान, चोरट्याने हिसकवलेल्या दोन सोन्याच्या पोतापैकी एक पोत चोरन्यात चोरट्याला यश आले तर दुसरी पोत वृध्द महिलेने चोरट्याच्या हाताला हिसका दिल्यामुळे ती जमीनवर पडल्यामुळे ती तिथेच लिलाबाई यांना मिळून आली आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासले
लिलाबाई पाटील यांनी पोत चोरून नेल्याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर रामानंद नगर पोलिस कर्मचार्‍यांनी लागलीच घटनास्थळी भेट देत पाहणी केली. घटना घडलेल्या ठिकाणाच्या शेजारीच शैलेश चौधरी हे राहतात यांच्या घरावर सीसीटीव्ही कॅमेर असल्याने पोलिसांनी चौधरी यांच्या यांच्यकडील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात सकाळी 6.52 वाजेच्या सुमारास चोरटा वृध्द महिलेचा पाठलाग करतांना दिसून आला आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याचा चेहरा स्पष्ट पोलिसांना दिसून आलेला नाही. दरम्यान, या घटनमुळे शिवकॉलनी परिसरात एकच खळबळ उडाली होती.