चोरलेली पर्स महिलेला परत

0

जळगाव । शहरातील सुभाष चौकातील भवानी माता मंदिरासमोरील ‘मोरनी हाऊस ज्वेल्स’ या दुकानातून एका महिलेची पर्स लांबविल्याची घटना घडली होती. मात्र, या पर्स चोरणार्‍या महिला टोळीचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर शोध लागला असून आहे. पर्स चोरणारी तरुणी ही एका नामांकित महाविद्यालयाची विद्यार्थी निघाली आहे. यातच चोरट्या महिलांच्या टोळीने चोरी केल्याचा नकार दिला मात्र, दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेज दाखविताच त्यांचे होश उडाले. त्यानंतर गुन्हा केल्याचे मान्य करुन त्यांनी चोरलेली पर्स संबंधित महिलेला परत केली.

शुक्रवारी संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ‘मोरनी हाऊस ज्वेल्स’ या दुकानातून गणेश कॉलनीतील महिलेची पर्स चोरी झाल्याची घटना घडली होती. या पर्समध्ये आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल व दोन हजार रुपये रोख असा ऐवज होता. ही पर्स एक महिला व मुलीने चोरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. शनी पेठ पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले होते,मात्र त्यांच्याकडून चोरट्या महिलांचा शोध लागला नाही. गणेश कॉलनीतील महिला खरेदीसाठी काऊंटरवर पर्स ठेऊन थांबलेली असताना एक मुलगी व एक महिला अशा दोघं जण 5.37 वाजता तेथे आल्या आहेत. त्यानंतर दोन मिनिटात चार महिला आल्या व काही क्षणातच या सर्व महिला गायब झाल्या होत्या.

अशी पटली चोरट्या महिलांची ओळख
दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेजमधील महिलांबाबत सतत दोन दिवस ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून माहिती काढली. त्यातील तरुणी ही एका महाविद्यालयातून वर्षभरापूर्वीच बारावीची परीक्षा देऊन बाहेर पडल्याचे समजले. दुकानदाराने त्या महाविद्यालयात जावून तेथे चौकशी केली. फुटेज दाखविले असता तरुणीची ओळख पटली. शाळेतून पत्ता मिळविल्यानंतर दुकानदार त्या तरुणीच्या घरी गेले. त्यांना पर्सबाबत विचारणा केली असता ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ याप्रमाणे तुम्ही मला ओळखता का?, मी पोलीस स्टेशनच्या दक्षता समितीची पदाधिकारी आहे असे सांगून दुकानदारावरच त्यांनी संताप व्यक्त केला. मात्र दुकानदारांनी सोबत नेलेले सीसीटीव्ही फुटेज दाखविले असता सर्व महिलांचा तोरा उतरला. चूक झाल्याचे मान्य करत त्यांनी पर्स परत केली व पोलिसात तक्रार न देण्याची विनंती केली.

शांतता समितीची पदाधिकारी
चोरट्या महिला या एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या पाठीमागील गल्लीत त्यांचे टूमदार असे दोन मजली घर आहे. यातील प्रमुख महिला ही नवी मुंबई परिसरात एका पोलीस स्टेशनच्या शांतता समितीची पदाधिकारी आहे.