चोरवड चेकपोस्टवर अवैधरीत्या गुरांची वाहतूक रोखली : 28 गुरांची सुटका

रावेर : मध्यप्रदेश-महाराष्ट्राच्या बॉर्डरवरील चोरवड चेक पोस्टवर गुरांची अवैधरीत्या होणारी वाहतूक आरटीओ अधिकार्‍यांनी रोखत 28 गुरांची सुटका केली. या प्रकरणी रावेर पोलिसात ट्रक चालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे तर गुरांची जळगावच्या गो शाळेत रवानगी केली आहे.

आरटीओ अधिकार्‍यांनी गुरांची केली सुटका
मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील चोरवड चेक पोस्टवर गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक (यू.पी.78 डी.एन.7084) रोखत त्याची तपासणी केली असता त्यात दाटी-वाटीने गुरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रावेर पोलिसांना माहिती कळवली. आरटीओ निरीक्षक राजाराम देवराम निमसे (53, चोरवड) यांनी रावेर पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिल्यावरून आरोपी मोहमंद जुनैद कुरेशी (19) व मुस्तकी मोहमंद कुरेशी (38, दोघे रा.चांदापूर, ता.पुखराया, जि.कानपूर) यांना अटक केली. पाच लाख 60 हजार किंमतीच्या 28 गुरांना जळगावच्या गो शाळेत हलवण्यात आल तर ट्रकसह एकूण 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवेले करीत आहेत.