जळगाव। शहरात वाढलेल्या घरफोड्यांच्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परराज्यातील आणि दुसर्या जिल्ह्यातील गुन्हेगार येऊन चोर्या करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे नवे गुन्हेगार पोलिसांनी चांगलीच डोके दुखी ठरत आहेत. कोर्ट चौकातील जे. टी. चेंबरमध्ये वायरलेस वर्ल्ड मोबाइलच्या दुकानात चोरट्यांनी शटर तोडून 16 लाख रुपये किमतीचे 124 मोबाइल हॅण्डसेट लंपास केले होते.
मात्र ही चोर्या करणारी टोळी परराज्यातील असल्याचा पोलिसांना संशय आहे. मोबाइल चोरी प्रकरणी तसेच 26 जानेवारी रोजी चोपडा मार्केटमधील संतोष ट्रेडर्स या सिगारेटच्या गोदामातून चोरट्यांनी 50 लाखांच्या सिगारेट लंपास केल्या होत्या. या दोन्ही प्रकरणात पोलिसांचा तांत्रिक तपास सुरू आहे. मोबाइल चोरीच्या प्रकरणात तांत्रिक तपासासह एक पथक तपासासाठी रवाना झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांनी दिली.