चोरीचा ट्रक घेणारे जळगावातील तिघे पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : चोरीचा ट्रक विकत घेणार्‍या तिघांना जळगावातून अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. संशयीतांना अधिक कारवाईसाठी भोपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

खून करीत लांबवला होता ट्रक
फरीद मोहम्मद शफीक मोहम्मद (35, रा.शहाजनाबाद भोपाल, मध्यप्रदेश) यांच्या मालकीचा ट्रक (एम.पी. 04 एच.ई.2915) हा 12 जुलै 2016 रोजी भोपाल येथील अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ लावण्यात आला असता त्यावर क्लिनर गुलाबसिंह हा होता. 12 जुलै ते 13 जुलै दरम्यान मध्यरात्री हा ट्रक चोरीस गेला तर क्लिनर गुलाबसिंग देखील मिसींग होता. निशातपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान या गुन्ह्यात लखनसिंग उर्फ नथनसिंग विश्वकर्मा (ग्रामपट्टन, समशाबाद, जि.विधया, मध्यप्रदेश), सराजखान असमतखान (42, रा.पालकमंदीर हायस्कूल, शहाबाजार, औरंगाबाद), संतोष सोनी उर्फ नितेश ओंकार सोनी (सनावत, भोपाल, मध्यप्रदेश) या तिघांना अटक करण्यात आली. दरम्यान आरोपींनी ट्रक चोरी करून क्लिनर गुलाबसिंग याचा खून केल्याची कबुली दिल्यानंतर चोरीचा ट्रक जळगाव येथील यासीन खान मासुम खान मुलतानी, अरबाज यासीनखान मुलतानी, निजामखान मासुमखान मुलतानी (तिघे रा. गणेशपुरी, मास्टर कॉलनी, अफजल उर्फ गुड्डू (जळगाव) यांना विकल्याची कबुली दिली होती. या चौघांपैकी 16 डिसेंबर 2020 रोजी यासीनखान मासूम खान मुलतानी याला अटक करण्यात आली होती तर इतर तिघे पसार होते.

तिघा संशयीतांना जळगावातून अटक
या गुन्ह्यातील आरोपी हे जळगाव असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक इम्रान सैय्यद, मुद्दस्सर काझी, किशोर पाटील, सचिन पाटील, साईनाथ मुढे यांनी कारवाई करत तिघांना अटक करीत पुढील कारवाईसाठी तिघांना भोपाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.