धुळे : जळगांव येथून चोरीच्या लोखंडी सळई घेऊन येणारा मिनीट्रक उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव यांच्या विशेष पथकाने महामार्गावर पकडला. या कारवाईत पोलिसांनी केलेल्या कारवाईत सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे. चौकशीनंतर गुन्हा दाखल केला जाणार आहे. पोलिसांना आज सकाळी दहा वाजता गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार मिनीट्रक 709 (एमएच 18-एम 0726) मधून जळगांव येथून चोरीच्या लोखंडी सळई आणल्या जात असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलिस अधिक्षक चैतन्या एस, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी व उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक आर.एस.सोनवणे, सपोनि घनःश्याम मोरे यांच्या नेतृत्वाखाली महामार्गावर ग्रस्त घालीत जळगांवकडून येणारी मिनीट्रक मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगांव चौफुलीवर थांबविला. त्याबाबत चौकशी केली असता चालकाने त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी ट्रकमध्ये तपासणी केली.त्यात असलेल्या सळईबाबतही कागदपत्राची मागणी केली मात्र ती आढळून न आल्याने सदरचा मिनीट्रक पोलिस अधिक्षक कार्यालयात आणण्यात आला. यात संशयित महंमद अली महंमद यासिन शाह (वय 43) रा. अब्बास हॉटेल जवळ आझादनगर धुळे याला ताब्यात घेतले. तसेच ट्रक व मुद्देमालही जप्त करण्यात आला. त्यात 4 हजार 235 किलो वजनाची 1 लाख 27 हजाराची लोखंडी सळई व 2 लाखाचा ट्रक असा 3 लाख 27 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत अधिक चौकशी करून गुन्हा दाखल केला जाणार आहे.