जेवण केले अन् पैसे नसल्याने चोरट्यांनी गाडी सोडून दिल्याची माहिती
रोझलॅन्ड शाळेजवळून 9 महिन्यांपूर्वी झाली होती चोरी
जळगाव- शहरातून 9 ते 10 महिन्यांपूर्वी रोझलॅन्ड शाळेजवळून समतानगरच्या तरुणाची दुचाकी चोरी झाली होती. ही दुचाकी पाळधी येथील हॉटेलमालकाकडे आढळून आली असून बिल न देणार्या ग्राहकांनी गाडी सोडून दिल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान तक्रारदाराच्या मित्राला ही दुचाकी आढळून आल्याने गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला आहे.
शहरातील समतानगर येथील दयाराम रामसिंग तंवर या तरुणाची दुचाकी (क्र एम.एच 19 बीए 799) रोझलॅन्ड येथून 9 महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तंवर यांनी पोलिसांसह दुचाकीचा शोध घेण्यासाठी अख्खा जिल्हा पिंजून काढली मात्र ती सापडली नाही.
जेवणाच्या बिलापोटी ठेवली दुचाकी
पोलिसांकडून मिळालेली महिती अशी की, दुचाकी चोरीनंतर चोरट्यांनी पाळधी येथे एका हॉटेलमध्ये जेवण केले. याठिकाणी जेवणाचे बिल देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी हॉटेलमालकाकडे पैशांपोटी दुचाकी ठेवली. व नंतर पैसे देवून दुचाकी घेवून जातो असे म्हणत निघून गेले. मात्र अनेक दिवस दुचाकी घ्यायला कुणीच आले नाही.
मित्राने दिली शहरात दुचाकी दिसल्याची माहिती
हॉटेलमालकाचा मित्र दुचाकी घेवून शहरात फिरत होता. ही दुचाकी तक्रारदार दयाराम तंवर यांचा समतानगर येथील मित्र अंनिस पठाण याला दोन दिवसांपूर्वी दुचाकी महाबळ परिसरात फिरताना दिसून आली. त्याने खात्री केली असता प्रत्यक्षात गाडी तंवर यांचीच निघाली.
सर्वांनी दुचाकीसह गाठले पोलीस ठाणे
यानंतर तंवर व पठाण या दोघांनी गाडीसह संबंधित गाडी ताब्यात असलेला तरुण व हॉटेलमालक असे सर्वच्या सर्व गुरुवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यात आणली. याठिकाणी घटनेचा तपास असलेले तपासअधिकारी दिपक सोनवेण यांच्यासमोर तंवर यांनी गाडी माझी असल्याचा प्रकार पोलिसांना कळविला. त्यावर हॉटेल मालकाने पैशांपोटी कुणीतरी माझ्याकडे दोन जण दुचाकी सोडून गेले ते पुन्हा परतले नसल्याची माहिती दिली. अखेर दुचाकी तंवर यांचीच असल्याची व त्यांना देण्यावर तडतोड झाल्याने सायंकाळी प्रकरणावर पदडा पडला. दरम्यान दुचाकी चोरणारे चोरटे कोण त्याचाही पोलीस शोध घेत असल्याचे तपासधिकारी यांनी तपासअधिकारी यांनी सांगितले.