एलसीबीची कारवाई
नंदुरबार : मोटरसायकल चोरी करणारे व चोरीची मोटरसायकल घेणारे अशा तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस कर्मचार्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
तुषार शालीग्राम कोळी (रा.म्हळसरे, ता.शिंदखेडा), सागर उर्फ भाईजी संतोष सावळे, जितेंद्र कैलास पाटील (रा.मोरतलाई, ता.पानसेमल) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात मोटरसायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून तपास सुरू होता. अशातच एलसीबीचे निरीक्षक किशोर नवले यांना गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे पाळत ठेवली असता खेडदिगर बस स्थानक आवारात एकजण मोटरसायकलवर संशयितरित्या फिरतांना आढळून आला. त्याची चौकशी केल्यावर त्याच्याकडे कागदपत्रे नव्हती. नंतर त्याने चोरीची मोटरसायकल असल्याचे सांगितले.
पोलीसी खाक्या दाखवताच त्याने नरडाणा, शिरपूर, धुळे तसेच सुरत येथून सहा मोटरसायकली चोरी करून मध्य प्रदेशात बडवाणी जिल्ह्यातील पानसेमल तालुक्यात विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पानसेमल तालुक्यातील मोरतलाई गावातील सागर उर्फ भाईजी संतोष सावळे यांच्या ताब्यातून चार महागड्या दुचाकी जप्त केल्या. जितेंद्र कैलास पाटील याच्या ताब्यातून दोन दुचाकी जप्त केल्या. तसेच तुषार शालीग्राम कोळी याने 15 मे रोजी चोरी केलेली दुचाकी पेट्रोल संपल्याने फेकून दिली होती. ती उपनगर पोलिसात जमा करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन लाख 40 हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी ताब्यात घेतल्या. शिवाय तुषार कोळी, सागर सावळे, जितेंद्र पाटील यांना अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक किशोर नवले, हवालदार जगदीश पवार, प्रदीप राजपूत, विनोद जाधव, विकास अजगे, राहुल भामरे, किरण मोरे, अविनाश चव्हाण, सतिष घुले, तुषार पाटील यांच्या पथकाने केली.