चोरीच्या चार दुचाकींसह दोघे चोरटे जाळ्यात : पारोळा पोलिसांची यशस्वी कामगिरी

पारोळा : पारोळा पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी या दुचाकी धरणगावसह चोपडा व निपाणे गावातून चोरी केल्याची कबुली दिली आहे. ज्ञानेश्वर सुभाष पाटील (21, राजीव गांधी नगर, पारोळा) व निलेश भिकन मराठे (22, रा.भोसले गल्ली, पारोळा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना अधिक तपासासाठी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पारोळा शहरातील संशयीत ज्ञानेश्‍वर पाटील याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यास चौकशीकामी ताब्यात घेत दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली मात्र संशयीताकडे कागदपत्रे नसल्याने त्याची खोलवर चौकशी केल्यानंतर आरोपीने साथीदार निलेश मराठेसोबत चार दुचाकी चोरीची कबुली दिल्यानंतर दोघा आरोपींना अटक करण्यात आली तसेच त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पारोळा पोलीस ठाण्याची निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश पाटील, हवालदार सत्यवान पवार, नाईक सुनील साळुंखे, कॉन्स्टेबल किशोर भोई, कॉन्स्टेबल दीपक अहिरे आदींच्या पथकाने केली.