जळगाव : चोरी केलेल्या दोन दुचाकींसह अट्टल आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गौरव उर्फ कट्टपा राजु कुमावत (29, रा.दत्त नगर, पहुर, ता.जामनेर) असे अटकेतील दुचाकी चोरट्याचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील किशोर पाटील व मुकेश पाटील यांनी गस्तीदरम्यान त्याला संशयास्पदरीत्या ताब्यात घेतल्यानंतर दोन गुन्हे उघडकीस आले.
गस्तीवर असताना संशयीत जाळ्यात
बुधवार, 16 मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक किशोर पाटील आणि पोलिस कॉन्स्टेबल मुकेश पाटील हे पेट्रोलिंग करत होते. दरम्यान अजिंठा चौफुलीनजीक त्यांना गौरव उर्फ कट्टपा हा बनावट चावीने एक मोटारसायकल चोरुन नेण्याच्या प्रयत्नात दिसताच त्यास ताब्यात घेण्यात आले होते. संशयीताला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडी दरम्यान त्याने चोरीच्या एकुण दोन मोटार सायकल पोलिसांना काढून दिल्या. त्यातील एक गुन्हा एमआयडीसी तर दुसरा गुन्हा पाचोरा पोलिस स्टेशन हद्दीतील आहे. त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक किशोर पाटील, विकास सातदिवे, गणेश शिरसाळे, योगेश बारी, मुकेश पाटील, चेतन सोनवणे आदींनी केली. अधिक तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करीत आहेत.