चोरीच्या मोबाईलचा लॉक उडण्यासाठी आला अन् एलसीबीने केली अटक

0

जळगाव- शहरातील सानेगुरुजी कॉलनीतून पायी चालणार्‍या महिलेचा हातातील 10 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावल्याची घटना 23 रोजी घडली होती. याप्रकरणी रामानंदगनर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. चोरीच्या मोबाईलचा लॉक तोडण्यासाठी संशयित बुधवारी गोलाणी मार्केटमध्ये आला अन् त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सागर सुपडू कोळी वय 23 रा. किनगाव असे संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सानेगुरुजी कॉलनी येथील कल्पनाबाई लक्ष्मीकांत सुर्यवंशी हे मुलगा परागसह कॉलनीतून पायी जात होत्या. यावेळी संशयिताने कल्पनाबाई यांच्या हातातील 10 हजाराचा मोबाईल हिसकावून नेला होता. याप्रकरणी कल्पनाबाई यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. एक तरुण गोलाणी मार्केटमध्ये चोरीच्या मोबाईलचा लॉक उघडण्यासाठी आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, प्रमोद लाडंवजारी, दादाभाऊ पाटील, परेश महाजन, दिपक शिंदे यांच्या पथकाने संशयित सागर कोळी यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबूली दिली असून पुढील तपासकामी त्यास रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तपासअधिकारी विनोद शिंदे यांनी संशयित सागर कोळी यास बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.