नंदुरबार ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातून गुजरात राज्यात तस्करी होणारी ३० लाखाची विदेशी दारु पोलीसांनी पकडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारूसाठा जप्त करण्यात आल्याने दारू तस्करीचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात राज्यात दारुबंदी असल्याने महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून मध्यप्रदेश, हरियाणा व गोवा राज्यातील दारुची गुजरात राज्यात तस्करी होत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारीवरून त्यांनी जिल्हयातील सर्व प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेला अवैध दारुची तस्करी करणार्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दि.१ जुलै २०२२ रोजी अधीक्षक पी.आर.पाटील यांना अशोक लेलॅन्ड कंपनीचा ट्रक हा साक्रीकडून गुजरात राज्यात अवैध दारू घेवून जाणार आहे अशी खबर मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील, पोना दादाभाई मासुळ, पोना जितेंद्र ठाकुर, पोना जितेंद्र तोरवणे, पोना तुषार पाटील, पोकॉ राजेंद्र काटके, पोकॉ आनंदा मराठे हे कारवाई करण्यास रवाना झाले.
पथकाने विसरवाडी येथे जावून नागपूर-सुरत या राष्ट्रीय महामार्गवर असणार्या ऍपल हॉटेलजवळ सापळा लावला. त्यावेळी लाल रंगाचा अशोक लेलॅन्ड कंपनीचा ट्रक क्रमांक (जी.जे. ०६ ए.झेङ ३५६०) हा साक्रीकडून येत असल्याचे गोपनीय सुत्रांनी सांगितले. या ट्रकला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी ऍपल हॉटेल जवळ इशारा देवून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन चालकाने काही अंतरावर वाहन उभे करून वाहन सोडून पळ काढला. पोलीस पथकाने संशयीत वाहनाची दोन पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात बेकायदेशिर वाहतूक करीत असलेली दारु मिळून आली.
दारुची पोलीसांनी मोजणी केली असता त्यात ३ लाख ६० हजार रुपये किंमतीचे रॉयल क्लासिको व्हिस्कीचे ७५० एमएलच्या ६० खोके, २५ लाख १७ हजार १२० रुपये किंमतीच्या रॉयल ब्ल्यु व्हिस्कीचे १८० एमएलचे ५१८ खोके मिळून आले. २८ लाख ७७,१२० रुपये किमंतीची विदेशी दारू व १५ लाख रुपये किंमतीचा अशोक लेलॅन्ड कंपनीचा ट्रक असा एकुण ४३ लाख ७७ हजार १२० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांना आढळून आला.हा मुद्देमाल पोलीसांनी कायदेशिर प्रक्रिया करुन जप्त केला. दारूची वाहतूक करणारे वाहन देखील चोरीचे असल्याचे आढळून आले आहे. याबाबत पोलीसांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.