मंगलपोत लांबविणार्यांची ‘धूम’ 20 दिवसांत पाच घटना; चोरीचे सोने जातेय कुठे?
किशोर पाटील
जळगाव- चोरट्यांनी गेल्या 20 दिवसांत ‘धूमस्टाईल’ पर्स, मंगलपोत आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या पाच घटना शहरात घडल्या असून, चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत 4 लाख 85 हजार रुपये आहे. या घटनांमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण तर आहे मात्र, यापूर्वी सिव्हीलमधील खून झालेल्या महिला डॉक्टरचे सोने एका सुवर्ण व्यावसायिकाकडे सापडल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता आताही जळगावातील सुवर्ण बाजारात चोरीच्या सोन्याची विल्हेवाट तर लावली जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक शिस्तीचे भोक्ते म्हणून ओळखले जातात. पण चोरी करणारा आणि चोरीचा माल विकत घेणारा अशा दोघांचाही छडा लावण्यात स्थानिक पोलीस अपयशी का ठरत आहेत? याचा शोध घेतला जाणे आवश्यक आहे.
शहरात सद्यस्थितीत धूमस्टाईल मोबाईल, पर्स, मंगलपोत लांबविणारी टोळी सक्रीय असल्याचे चित्र आहे. दुचाकीवरुन येवून चोरटे अचानक
काही कळण्याच्या आत महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र, सोन्याची चेन, खांद्यावर लटकवलेली मोठ्या प्रमाणावर ऐवज असलेली पर्स लांबवित आहेत. याप्रकरणी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखलही करण्यात आले आहे मात्र अद्यापर्यंत चोरटे गवसलेले नाहीत.
अशा आहेत घटना
3 डिसेंबर रोजी ः आहुजानगर येथील अर्चना लक्ष्मण लोखंडे (वय 32) या शतपावली करत असताना चोरट्यांनी दुचाकीवरुन धूमस्टाईल त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबविले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल आहे.
16 डिसेंबर ः रोजी दादावाडी येथे लग्नासाठी आलेल्या रायगड जिल्ह्यातील मीनाक्षी विनायक महाले (वय 48) यांचा चोरट्यांची धूमस्टाईल गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचा राणी हार लांबविला होता. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल आहे.
17 डिसेंबर ः कमल लॉन्स येथे लग्नाच्या धामधुमीत चोरट्यांनी मंगला अनिल महाजन या अयोध्यानगरातील महिलेचे 3 लाख 5 हजार रुपयांचे दागिणे लांबविले. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. विशेष 16 डिसेंबरला चोरीची घटना ताजी असताना दुसर्या दिवशीची चोरट्यांनी हा ऐवज लांबविला होता.
21 डिसेंबर ः विजया रमेश पाटील (वय 64) रा.रामनगर या गणेश कॉलनीत नवसाचा गणपती येथे दर्शनासाठी जात असताना चोरट्यांनी धूमस्टाईल त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याची पोत असा 60 हजाराचा ऐवज लांबविला होता.
या सर्व घटनांमध्ये चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर दागिण्यांचा ऐवज लांबविला आहे. चोरटे चोरी झाल्यानंतर सोन्याची कोणत्या ठिकाणी विक्री करुन पैसे मिळवित आहे किंवा कोणत्या सराफाच्या मदतीने त्याची विल्हेवाट लावत आहे हे प्रश्न अनुत्तरीत आहे. चोरीच दागिणे घेणार्यांमुळेच चोर्या वाढल्याचेही बोलले जात आहे.
पोलीस कर्मचार्याच्याच पर्समधून ऐवज लांबविला
21 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत आशा काळू पांचाळ (वय 30) या महिला पोलीस कर्मचारी नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असताना पर्समधील 20 हजाराचे दागिणे व पाच हजार रुपये रोख असा 20 हजाराचा एैवज लांबविला होता.
दरोडेखोरही सापडेनात?
11 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता आकाशवाणीच्या मागील बाजूस रितेश कटारिया या व्यापार्याच्या मानेला सुरा लावत दरोडेखोरांनी तीन लाखांचे सोने लुटून नेले होते. थरारक दरोड्याला 12 दिवस उलटूनही अद्यापर्यंत दरोडेखोरांचे धागेदारे लागलेले नाहीत. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित कैद झालेले असताना त्यांचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे.