जळगाव । शहरातील नवी पेठ व मास्तर कॉलनीत काही महिन्यांपूर्वी घरफोड्या झाल्या होत्या. या घरफोड्यातील चोरट्यांना पकडून पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हस्तगत केलेला 12 लाखांचा मुद्देमाल हा न्यायालयाच्या आदेशाने आज गुरूवारी पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याहस्ते मुद्देमालाच्या मुळमालकांना परत करण्यात आले. याप्रसंगी कार्यालयात उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, शहर पोलिस ठाण्याचे प्रदिप ठाकूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक गंधाळे तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुनिल कुर्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अशा घडल्या घटना; असा मिळाला मुद्देमाल
नविपेठ परिसरातील पुष्पा शामसुंदर चक्रवर्ती (वय-80) या वृध्द महिलेच्या घरी चोरट्यांनी 10 जून ते 17 जून 2016 दरम्यान चोरट्यांनी घरफोडी करत 30.7 तोळे सोन्याचे दागिने, 110 ग्रॅम चांदीचे दागिने, 2 लाख रुपयांची रोकड असा 8 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यानंतर अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर पोलिस निरीक्षक प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखालली सहाय्यक पोलिस निरिक्षक गंधाले व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचार्यांनी 24 तासात घरफोडी उघड करून आबा दामु सोनवणे (रा.गेदालाल मिल), मनोज कोळी, दत्तु राजाराम पाटील यांना अटक करुन त्यांच्याकडून 27.2 तोळे वजनाचे सोन्याचे दागीने,100 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, 4 हजार 700 रुपये किमतीचा मोबाईल,20 हजार रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत केला होता.
दागिने दिले काढून
दुसर्या घटनेत अॅग्लो उर्दू हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शेख मोहम्मद इक्बाल शेख उस्मान (रा. अक्सा नगर) यांच्या घरात चोरट्यांनी 3 ऑक्टोंबर 2016 रोजी डल्ला मारीत 40 तोळे सोने व अडीच लाख रूपयांची रोकड चोरीस गेले होते. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस अधिक्षकांच्या व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोनि. सुनिल कुर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी तपास करून मोहसिन शेख उर्फ दत्ता हमीद शेख आणि दोन आरोपीतांकडुन चोरी गेलेल्या सोन्या पैकी 228.83 ग्रॅम सोन्याचे लगड व बिस्कीट हस्तगत करण्यात आला होता.
न्यायालयाच्या आदेशाने मुद्देमाल परत
शहर पोलिसांनी तसेच एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही घरफोड्यांचा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आल्यानंतर मुळ मालकांना त्याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर कायदेशिर रित्या पुष्पा शामसुंदर चक्रवर्ती यांनी उच्च न्यायालयातून तर शेख मोहम्मद इक्बाल शेख उस्मान यांनी जिल्हा न्यायालयातून मुद्देमाल मिळण्याबाबतचे आदेश प्राप्त केले.
पोलीस अधीक्षकांचा सत्कार
आज गुरूवारी उपविभागीय अधीकारी सचिन सांगळे यांच्या कार्यालयात पुष्पा चक्रवती व शेख मोहम्मद इक्बाल शेख या मुद्देमालाच्या मुळमालकांना बोलविण्यात आले. यानंतर पुष्पा चक्रवती यांना पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांच्याहस्ते हस्तगत केलेला 6 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यानंतर शेख मोहम्मद इक्बाल यांना देखील सहा लाख 80 हजार रुपयांचे 228.83 ग्रॅम सोन्याचे लगड व बिस्कीट त्यांना परत करण्यात आले. यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांचा गुन्हा उघड करून मुद्देमाल रिकव्हर केल्याने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.