जळगाव। शिवतीर्थ मैदानासमोरील जे. टी. चेंबरमध्ये राजेंद्र अरूण बारी आणि पुरूषोत्तम अरूण बारी या दोन्ही भावांच्या मालकीच्या वायरलेस वर्ल्ड मोबाइलचे दुकानातून 6 एप्रिल रोजी रात्री चोरट्यांनी 17 लाख रुपये किमतीचे 107 मोबाइल लंपास केले होते. या चोरी झालेल्या मोबाईल हॅण्डसेटपैकी 90 मोबाईल नेपाळमध्ये अॅक्टीव्हेट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही फूटेज व मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पेठ पोलिसांचे संयुक्तपथक गेल्या महिन्यात बिहारमधील नेपाळ सीमेवरील होडासन या गावात गेले होते. मात्र चोरटे पोलिसांचे पथक जाण्याअगोदरच नेपाळमध्ये पसार झाल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते.
मोबाईल चोरटे बिहारचे..
बिहारमधील होडासन हे गाव नेपाळच्या सीमेवर असून या गावापासून केवळ तीन ते चार किलोमीटरवर नेपाळची सीमा आहे. या गावातील एक मोठी टोळी फक्त मोबाइलची दुकाने फोडून चोर्या करण्यात पटाईत आहेत. त्यामुळे या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर एलसीबी आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पथक गेल्या महिन्यात बिहारमध्ये होडासन येथे गेले होते. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. चोरट्यांनी मोबाइल नेपाळमध्ये विकल्याचा पोलिसांना त्यावेळी संशय आला होता.
नेपाळमध्ये केली जाते मोबाईलची विक्री..
एका देशातून मोबाईल चोरून दुसर्या देशात विक्री केल्याने दोन्ही देशातील कायद्याच्या अडचणीमुळे सुरक्षा यंत्रणाही हतबल होत असतात त्यामुळे याचा फायदा होडासन येथील मोबाइल चोरांची टोळी अनेक वर्षापासून घेत आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यात जाऊन शहरात थांबायचे. दहा ते पंधरा जणांची टोळी एका ठिकाणी चोरीसाठी जाते. चोरी झाल्यानंतर चोरलेले मोबाइल घेऊन रेल्वेने होडासनकडे रवाना होतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर मोबाइल घेऊन काही चोरटे नेपाळमध्ये निघून जातात. त्या ठिकाणी मोबाइल घेणारा तयार असतो. तो एकत्र मोबाइल विकत घेऊन नेपाळमध्ये त्यांची विक्री करतो.