दिवसाढवळ्या चोर्यांचे प्रमाणही वाढले, पोलीस बळाची संख्या कमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पोलीस प्रशासनाचे अपयश उघड
भिवंडी । शहर परिसरात चोर्या, घरफोड्या, वाहन चोर्या, मोटारसायकलवरून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचणे, रहिवाशांच्या हातातील पैसे व चीजवस्तू हिसकावणे असे प्रकार नित्याचेच होऊन बसले आहेत. गुन्हेगारांवर पोलीस यंत्रणेचा वचक राहिलेला नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगार प्रवृत्तीच्या भामट्यांचे धैर्य वाढू नये त्याचप्रमाणे आपण व आपली मालमत्ता सुरक्षित आहे, असा विश्वास स्थानिक रहिवाशांना वाटावा यासाठी पोलीस यंत्रणेने गांभीर्याने उपाययोजना करावी अशी अपेक्षा येथील रहिवाशी व्यक्त करीत आहेत. रात्रीच्या वेळेप्रमाणेच आता दिवसाढवळ्या देखील चोरीचे प्रमाण वाढत चालल्याने नागरिकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास कमी होत चालला आहे. याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
पोलीस यंत्रणेने गांभीर्याने उपाययोजना करावी अशी मागणी
धामणकरनाका भागात नासिर मंजील इमारतीच्या तिसर्या माळ्यावर राशिद शहा मोहम्मद शेख यांची सदनिका आहे. सदनिका बंद करून ते गावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील ७० हजार रूपये किमतीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. शेख काही दिवसांनी घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले. त्यांनी तत्काळ भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार नोंदवली. मानकोली गावात एस.एन.तिवारी राहतात कामानिमित्त ते बाहेर गेल्याचा फायदा घेत घराचा कडीकोयंडा तोडून २० हजार रूपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा एलईडी टीव्ही चोरून नेला. भावाच्या घरी चोरी झाल्याची माहिती बहीण पूजा तिवारी हिला समजल्यानंतर ती दापोडा गावाहून मानकोली येथील भावाच्या घरी आली. चोरी झाल्याची खात्री करून नारपोली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरूद्ध तक्रार दाखल केली.
पोलीस बळ कमी पडतेय!
भिवंडी परिमंडळ दोन अंतर्गत एक पोलीस उपायुक्त, दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, एक गुन्हे शाखा आणि सहा पोलीस स्टेशन्समध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी अशा फौजफाट्यासह राज्य राखिव पोलीस दलाच्या कंपन्या बंदोबस्तांसाठी बारमाही तैनात आहेत. येथील लोकसंख्येचा विचार करता पोलीस बळाची संख्या निश्चितपणे कमी आहे.
डोंबिवलीत ६ लाखांचा मुद्देमाल लंपास
गेल्या काही महिन्यांपासून कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात घरफोडयांचे सत्र सुरू झाले आहे. रात्री अपरात्री कुलूप असलेल्या घरांमध्ये चोरी करणारे चोरटे आता दिवसाढवळ्या बंद घरांना लक्ष्य करत आहेत. डोंबिवलीत बंद घराचे कुलूप तोडून घरातील पाच लाख ९२ हजारांचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. डोंविवली पूर्वेकडील गुंजन सोसायटीमध्ये राहणारे नीतिन धुमाळे व त्यांची पत्नी काल सकाळी कामानिमित्त घराला लावून बाहेर गेले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व नगद असे मिळून एकूण पाच लाख ९२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांना सदर बाब लक्षत आली. त्यांनी याप्रकरणी टिळकनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रार नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. परिसरात आता दिवसाढवळ्या चोर्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे.
दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या
जुना ठाणे रस्ता मंडईकडे जाताना भारत मेडीकलच्या कडेला नसीम मोहम्मद खलील खुशाल यांनी लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळविली. त्यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. काटई गावात राहणारे अमोल गायकवाड अंजूरफाटा माऊली रूग्णालयात उपचार घेणार्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी दुचाकी हरीधरा कॉम्प्लेक्स येथे लावली असता चोरट्यांनी ती पळविली.