चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा!

0

पुणे (प्रतिनिधी) – बहुचर्चित 24 बाय 7 पाणी पुरवठा योजनेला अखेर सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शहराला चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनी, केबल डक्ट, पाणी मीटर आणि मेन्टनन्सच्या कामाच्या सहापैकी पाच कामे ‘एल अ‍ॅण्ड टी’ला तर एक काम जैन एरिगेशनला देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे आता पुणेकरांना 24 तास समान पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एक काम जैन एरिगेशनला देणार!
महापालिकेच्या निविदा प्रक्रियेच्या संकेतानुसार कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचे काम एकाच कंपनीला दिल्यास त्या कंपनीच्या कारभारात एकाधिकारशाही निर्माण होते. प्रसंगी बदलत्या परिस्थितीनुसार कंपनी स्वत:च्या मागण्या रेटून नेत त्यांना हवे ते निर्णय घेऊ शकते. किंबहुना कामही अर्धवट ठेऊ शकते. असे झाल्यास प्रकल्प बंद पडणे अथवा रेंगाळू शकतो. त्यामुळे एखाद दुसर्‍या प्रकल्पाचे काम सेकंड लोवेस्ट निविदा भरलेल्या कंपनीला देण्यात येते. त्यानुसार एका कामाची निविदा जैन एरिगेशनला देण्यात आली आहे. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेसाठी पालिकेने सहा पॅकेजमध्ये निविदा मागविल्या आहेत. सुमारे 2315 कोटी रुपयांच्या या निविदा सरासरी 11 टक्के कमी दराने आल्या असून, महापालिकेला 2050 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.