पुणे । शहरातील रस्ते व चौकांच्या नामफलकासाठी पालिका महापौर विकास निधीतून तब्बल 2 कोटी 8लाख रूपये खर्च करणार आहे. त्यासाठी मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समितीमध्ये या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. अशा प्रकारे एवढया मोठया प्रमाणात महापौर निधी एकाच कामावर खर्च करण्याची ही महापालिकेतील पहिलीच वेळ आहे.
महापौरांचा ऐच्छिक निधी असल्याने तो खर्च करण्याचे सर्व अधिकार त्यांना असतात. भाजप महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर सत्ताधारी भाजपच्या महापौर मुक्ता टिळक यांनी महापौर विकास निधीतून शहरातील सर्व रस्ते, चौक तसेच महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, पादचार्यांसाठी सुविधा देणे, तसेच रस्त्यांच्या व चौकांच्या माहीती वाहनचालक तसेच नागरिकांना उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने ही कामे प्रस्तावित केली असून त्यानुसार, हे फलक संपूर्ण शहरात नव्याने बसविले जाणार आहे. शहरातील एका खासगी कंपनीने महापालिकेने प्रस्तावित केलेले 2 कोटी 25 लाखांचे काम 4.67 टक्के कमी दराने करण्यास स्थायी समितीने मान्यता दिलेली आहे.
निवडणुकांपूर्वी लावले होते नामफलक
महापालिका निवडणूका होऊन अवघे वर्ष लोटले आहे. मात्र, जानेवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुका होणार असल्याने त्या पूर्वीच्या नगरसेवकांनी निवडणुकांचे वर्ष लक्षात घेऊन स’ यादीतून तसेच वॉर्ड स्तरीय निधीतून मोठया प्रमाणात खर्च करून शहरभरातील रस्ते तसेच चौकांमध्ये नामफलक लावले आहेत.
पुन्हा नामफलकांवर रक्कम खर्च
या वर्षात भाजपची सत्ता आल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपल्या निधीतून जुने फलक काढून अनेक ठिकाणी नवीन नामफलक लावले आहेत. असे असतानाच, महापौर विकास निधीतून नव्याने नामफलक बसणार आहेत. त्यामुळे अवघ्या दीड वर्षात शहरात तिसर्यांदा नामफलक बसणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.