चौघांच्या अपात्रतेचा प्रस्ताव

0

भुसावळ। नगरपालिकेची नुकतीच झालेली पहिली सर्वसाधारण सभा हि वादग्रस्त ठरली. यामध्ये इतिवृत्त वाचन करण्यावरुन जनाधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. याप्रकरी मुख्याधिकार्‍यांनी अगोदरच तीन नगरसेवकांविरुध्द बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून आता जनाधार विकास पार्टीच्या 4 नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी मुख्याधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव दिला आहे.

सर्वसाधारण सभेत शहरातील सर्व प्रभागांत विकासकामे करण्यासाठी विषय घेण्यात आले होते. तरी देखील हि सभा वादग्रस्त ठरली. पहिल्या विषयापासूनच वादास सुरवात झाली व गोंधळात 120 विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली होती. या बैठकित विरोधकांचा रोष सत्ताधार्‍यांपेक्षा मुख्याधिकार्‍यांवरच अधिक असल्याचे दिसून आले. गोंधळात गोंधळ मुख्याधिकार्‍यांना काही नगरसेवकांना धक्काबुक्की झाली तर काहींनी त्यांना गोंधळातून सुखरूप बाहेर काढण्यात पुढाकार घेतला.

माजी आमदारांच्या चिंतेत झाली वाढ
या माजी आमदार संतोष चौधरी यांचे समर्थक जनाधार विकास पार्टीच्या माध्यमातुन निवडून आले. परंतु पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकिच्या वेळेस जनाधार पार्टीच्या तालुका व शहराध्यक्ष पदावरुन चौधरी समर्थकांना बाजुला करण्यात आले. त्यामुळे चौधरींनी या निवडणुकित उमेदवार पाहून सहाय्य केले. पालिकेच्या साधारण बैठकित गैरवर्तनामुळे त्यांच्या 4 सदस्यांना अपात्र करण्यासाठी मुख्याधिकारी बाविस्करांनी प्रस्ताव दिला. त्यापुर्वी त्यांनी या नगरसेवकांविरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने चौधरींच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सभा रद्द करण्याची मागणी
सभेत यासंदर्भात पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले असून पालिकेने घेतलेली सभा बेकायदेशीर आहे. नियमानुसार अर्थसंकल्पीय तरतूद झाल्यानंतरच सभा घेतली जाते, मात्र सत्ताधार्‍यांनी निमय तुडवून सभा घेतल्याने तरी रद्द करण्यात यावी, तसेच जनाधार पार्टीच्या नगरसेवकांवर धक्काबुक्की केल्याचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून ते गुन्हे रद्द येऊन सभेत अनेक करण्यात येण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत धक्काबुकी तसेच सरकारी कामात अडथळा आणणार्‍या चार नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात पालिका प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी व नगरविकास विभागात प्रस्ताव दिले आहेत. यामध्ये जनाधार पार्टी गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक रवि सपकाळे, संतोष त्र्यंबक चौधरी, पुष्पा सोनवणे यांच्या नावांचा समावेश आहे.
 बी. टी. बाविस्कर, मुख्याधिकारी

यांचा आहे समावेश
सभेत गैरवर्तन करणे व मुख्याधिकारी बाविस्कर यांना धक्काबुक्की केल्यामुळे जनाधार विकार पार्टीचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते उल्हास पगारे, नगरसेवक रविंद्र सपकाळे, संतोष त्र्यंबक चौधरी, स्विकृत नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे यांना अपात्र करण्यात यावे यासाठी मुख्याधिकारी बाविस्कर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव दिला आहे. यातील तीन नगरसेवकांविरुध्द अगोदर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही त्यांना अटक करण्यात आलेली नाही.