न्यायालयात असणार पोलिसांना बंदोबस्त
जळगाव : शहरातील चौघुले प्लॉट भागातील किशोर मोतीलाल चौधरी (32) याच्या खून खटल्याचा निकाल शुक्रवारी जाहीर केला जाणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे. या खटल्यात सरकारपक्षातर्फे 14 तर बचावासाठी 4 असे 18 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय आवारात पोलिसांचा वाढीव बंदोबस्त लावण्यात येणार आहे.
गणेश विश्वास सपकाळे याच्याविरुध्द दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात सागर मोतीलाल चौधरी फिर्यादी आहे. या गुन्ह्यात सागर चौधरी याने गणेश सपकाळे याला मदत करावी, कोर्टात विरोधात साक्ष दिली आहे असे म्हणत सुरेश दत्तात्रय सोनवणे, उमेश धनराज कांडेलकर या दोघांनी बर्फ फोडण्याच्या टोच्याने व इतरांनी किशोर चौधरी याच्यावर हल्ला केला होता तर भांडण सोडविण्यासाठी आलेले मोतीलाल भावलाल चौधरी, योगीता किशोर चौधरी, जयश्री सागर चौधरी, सुभद्राबाई मोतीलाल चौधरी व नीलेश पंडीत चौधरी यांना इतर 10 ते 15 जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. दरम्यान, उपचार सुरु असताना किशोर चौधरी याचा मृत्यू झाला होता. तपासाधिकारी तत्कालिन पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
गुन्हा घडल्यापासून 12 जण कारागृहात
याप्रकरणी मोतीलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरुन सुरेश दत्तात्रय सोनवणे, उमेश धनराज कांडेलक, रत्नाबाई सुरेश सानेवणे, वैशाली उमेश कांडेलकर, रंजनाबाई भगवान कोळी, योगीता गणेश सपकाळे, सखुबाई विश्वास सपकाळे, सागर जगन्नाथ सपकाळे, ज्ञानेश्वर भीवसन ताडे उर्फ नाना मराठे, गणेश विश्वास सपकाळे (कोळी),अंजना किशोर कोळी, भगवान बाबुराव कोळी व किशोर अनिल कोळी यांच्याविरुध्द शनी पेठ पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गणेश सपकाळे वगळता इतर 12 जण घटना घडल्यापासून कारागृहात आहेत. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले आहे.