गुजरात । पवित्र रमजान महिन्यातील उपवास अर्थात रोजा म्हणजे ‘संसर्गजन्य आजार’ असल्याचे वर्णन गुजरातच्या पाठ्यपुस्तक मंडळाने हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील एका धड्यात केला आहे. काही दिवसांपूर्वी गुजरात शिक्षण मंडळाने एका पुस्तकातील पाठ्यात येशू ख्रिस्ताला ‘सैतान‘ संबोधून वाद ओढवून घेतला होता. गुजरात पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता चौथीच्या हिंदी पुस्तकात रोजा हा संसर्गजन्य आजार असल्याचा उल्लेख केला आहे.
2015 पासून हे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात आहे. याआधीच्या पुस्तकाच्या आवृत्त्यांमध्ये अशी चूक झाली नव्हती. 2017 मध्ये छपाई झालेल्या पुस्तकांमध्ये ही चूक झाली आहे, असेही पेठाणी यांनी सांगितले. हिंदी माध्यमाच्या मुलांसाठी दुरुस्तीपत्रक जारी करण्यात येईल. या माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने 15 हजार प्रतीच छापण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी मंडळाकडे कोणत्याही संघटनेने अधिकृत तक्रार केलेली नाही, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. आमची संस्था पाठ्यपुस्तक मंडळ आणि राज्य सरकारकडे याबाबत तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. धर्माशी संबंधित चुका स्वीकारल्या जाणार नाहीत. दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याचे अहमदाबादच्या ’आरटीई’ फोरमचे मुजाहिद नफीस यांनी सांगितले.
‘प्रिटिंग मिस्टेक‘असल्याचे स्पष्टीकरण
पुस्तकात पान क्रमांक 13 वर प्रेमचंद यांची ’इदगाह’ ही कथा आहे. या कथेच्या शेवटी शब्दार्थ दिले आहेत. त्यात रोजा या शब्दाचा अर्थ दिला आहे. रोजा म्हणजे एक संसर्गजन्य रोग असून त्यामुळे जुलाब आणि उलट्या होतात, असे म्हटले आहे. याबाबत गुजरात शिक्षण मंडळाने ही ‘प्रिटिंग मिस्टेक‘असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘हैजा‘(कॉलरा) या शब्दाऐवजी चुकून रोजा हा शब्द टाईप झाला आहे, असे गुजरात पाठ्यपुस्तक मंडळाचे अध्यक्ष नितीन पेठाणी यांनी सांगितले.