चौपदरीकरणाच्या कामावर असणारा अभियंताच अपघातात ठार !

0

कामाच्या ठिकाणीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना !

जळगाव: राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामावरील कंपनीच्या अभियंता सागर प्रकाश बऱ्हाटे (22) रा.हनुमान नगर भुसावळ याचा महामार्गावरच झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. सागर बऱ्हाटे हा रस्ता ओलांडत असताना त्याला चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यातच तो ठार झाला. महामार्गावरील मकरा फटाके एजन्सीजवळ दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. महामार्गाने आजपर्यंत अनेक बळी घेतले आहे. दरम्यान आता महामार्गाच्या कामावरील अभियंत्याचाच जीव गेला आहे.

भुसावळ-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आयुष प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला चौपदरी करण्याचा ठेका मिळालेला आहे. त्यानुसार दीड वर्षांपासून महामार्गाचे काम सुरू आहे. या कंपनीत इंजिनिअर म्हणून सागर बऱ्हाटे चार महिन्यांपूर्वी रुजू झाला आहे. नेहमीप्रमाणे आज शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास सागर कामावर आला महामार्गावरील मकरा एजन्सी जवळ आज काम सुरू होते या दरम्यान रस्ता पार करत असताना चुकीच्या बाजूने भुसावळ कडून जळगावकडे येणाऱ्या विना नंबरच्या बोलोरोने धडक दिली. या धडकेत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धडक दिल्यानंतर महिंद्रा कंपनीची बोलरो गाडी घटनास्थळावरून पसार झाली.

साईटवर काम करणाऱ्या सहकारी मित्रांनी सागरला तातडीने ऑर्किड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले याठिकाणी सागरचा मृत्यू झाला. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे. सागरच्या पश्चात आई मीनाक्षी, वडील प्रकाश रामा बऱ्हाटे, भाऊ पुष्पक असा परिवार आहे. वडील भुसावळात वर्कशॉपचे काम करतात.