चौपदरीकरणासाठी पेणमध्ये पत्रकारांचे साखळी आंदोलन

0

पेण । मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून पडलेले खड्डे तसेच खोदून ठेवलेला रस्ता यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन 8 वर्षे झाली तरीदेखील 50 टक्के काम पूर्ण झालेले नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रायगडसह कोकणातील पत्रकार रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस.एम. देशमुख व कोकण मराठी परिषदेचे किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महामार्गावर वडखळ नाक्यावर मानवी साखळी व पोस्टर आंदोलन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष शरद पाबळे, प्रभाकर क्षीरसागर, पेण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश प्रधान, कार्याध्यक्ष राजेश कांबळे, सल्लागार दीपक लोके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, सुनील वाळुंज, रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय मोकल, मिलिंद अष्टीवकर, अनिल भोळे, अभय आपटे, श्रीकृष्ण बाळ, मनोज खांबे, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, रा.जि.प सदस्य प्रभाकर म्हात्रे, रायगड जिल्हा विक्रम-चालक मालक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, पेण पंचायत समिती सदस्य राजेश मोकल, मनसेचे अंकुश म्हात्रे, सरचिटणीस मनोहर पाटील, योगेश पाटील, तुळशीदास कोठेकर, अनिल म्हात्रे, परशुराम म्हात्रे, संतोष ठाकूर आदीसह जिल्ह्यांतील पत्रकार उपस्थित होते.

चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी गेली 9 वर्षे रायगड व कोकणातील पत्रकार विविध आंदोलनाद्वारे शांततेच्या मार्गाने लढत आहेत. पत्रकारांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. सुरुवातीला हे काम युद्धपातळीवर सुरू होते. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. कधी ठेकेदाराचा प्रश्‍न, शासकीय कार्यालयांची अनावस्था, भूसंपादन खात्याची उदासीनता या व इतर कारणांमुळे आज 10 वर्षे झाली, तरी हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही, हे विदारक सत्य आहे.

अन्यथा न्यायालयात जाणार
मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण समस्यासाठी न्यायालयात जाणार असून, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे, सरकारने येत्या 26 जानेवारीपर्यंत महामार्गाचे काम जलदगतीने करावे अन्यथा 26 जानेवारीला पत्रकार काळा दिन साजरा करणार असल्याचा इशारा एस.एम.देशमुख यांनी दिला. या वेळी पत्रकारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार अजय पाटणे यांना दिले.