भुसावळ। जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त अजूनही सापडलेला नाही. गेल्या पाच वर्षांपासून केवळ भूसंपादन व निविदांच्या तांत्रिक घोळात महामार्गाला लागुन असलेले लाखो डेरेदार वृक्ष निर्देश नसतांनासुद्धा कापली गेल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांतर्फे वेळोवेळी करण्यात आल्या. मागील दोन महिन्यापासून धुळे येथील प्रकल्प विभागाला वारंवार संदेश देवूनसुद्धा फक्त चौपदरीकरणाची कामे लवकर सुरु करु असे वारंवार सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात कामे न झाल्यामुळे शिवसेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वृक्षतोडीआधी वृक्षारोपण करणे गरजेचे
रस्ता चौपरीकरणासाठी जमीन अधिग्रहण होण्यापुर्वीच वरणगावपासून भुसावळ ते थेट जळगाव रस्त्याला लागुन असलेली वृक्ष तोडण्यात आली. यामुळेच या परिसरातील पर्यावरण बिघडले तापमान 43 अंश पर्यंत गेले. चौपदरीकरणाच्या कामाची सुरुवात वृक्षतोडीपासून करू नये आधी वृक्षारोपण करावे अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. परंतु कंपनीतर्फे कोणत्याही प्रकारची काळजी घेतली गेली नसल्यामुळे जिल्ह्यातील तापमानात कमालीची भर पडली असल्याचे प्रा. धीरज पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
परिस्थितीचा आढावा घेणार
महामार्ग चौपदरीकरणासाठी वेळेत जमीन ताब्यात न मिळाल्याने कंपनीने मागितलेला वाढीव मोबदल्याबाबत केंद्र सरकारकडून उत्तर न मिळाल्यामुळे चौपदरीकरण रखडले आहे. परंतु काम सुरू केल्यानंतर जिल्हाभरात तब्बल 15 हजार झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यामुळे चौपदरीकरणासह झाडांची पुनर्लागवड देखील लांबली आहे. येथे केलेली वृक्ष तोड जिल्ह्यात आतापर्यंतची ही सर्वात मोठी वृक्षतोड आहे. परंतु पुनर्लागवड व संवर्धन याबाबत नेमकी काय तयारी किवा नियोजन आहे याबद्दल अजून काहीही माहिती नाही. त्यामुळे वृक्ष पुनर्लागवड करण्याचे काम देखील लवकर करण्यात यावे अन्यथा शिवसेनेतर्फे रास्ता रोको, आंदोलने करण्यात येणार आहे. मागील वर्षी 2 कोटी 83 लाख वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या वार्षिक अहवालात विधानसभेमध्ये सांगितले आहे. या 2 कोटी 83 लाख वृक्षांपैकी शासनातर्फे या महामार्गालगत किती वृक्षारोपण केले गेले आहे तसेच त्याचा पंचनामा करून त्यांची सद्य स्थितिसुध्दा शिवसेनेतर्फे जाणून घेण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.
जीवसंपदाच धोक्यात
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम विविध कारणांमुळे रखडले असले तरी यासाठी आतापर्यंत 15 हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. शेतकरी, ठेकेदार आणि सरकारच्या वादात या वृक्षांचे संवर्धन आणि पुनर्लागवड या विषयाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे जीवसंपदाच धोक्यात आली आहे. महामार्गाच्या कडेच्या डेरेदार वृक्षांवर राहणारे अनेक दूर्मिळ जातीचे पक्षी यामुळे विस्थापित झाले असून, ते नामशेष होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.