जळगाव । जळगाव महानगर पालिकेच्या निर्देशित केलेल्या वैध हद्दीतून जात असलेल्या नियोजीत महामार्गाचे चौपदरीकरण करताना गिरणा नदीवर नवीन पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाचे बांधकाम करताना पूल-कम-बंधारा अशी रचना करावी, ही विनंती आ.चंदूभाई पटेल यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय परिवहन मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे. दिल्ली येथे मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार चंदूलाल पटेल यांनी ना. नितीन गडकरी यांच्याशी याविषयावर चर्चा केली.
आ. चंदूभाई पटेल यांची मागणी
जळगाव शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरण कामास लवकरच सुरुवात होणार आहे. चौपदरी महामार्ग शहराबाहेरुन जाणार असून त्यात गिरणा नदीवर नवीन पूल बांधण्यात येणार आहे. बांभोरी ते जळगाव शहराला जोडणार्या या पुलाचे बांधकाम करताना बंधारा कम पूल असे बांधकाम करण्यात यावे. अशी विनंती आ.चंदूभाई पटेल यांनी केंद्रीय परिवहन मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. गिरणा नदीवर पूल कम बंधारा बांधल्यास नदीचे वाहून जाणारे पाणी अडविले जावून परिसरातील शेतकर्यांना आणि गावांना त्याचा फायदा होईल. तसेच जळगाव शहराला पाणीटंचाईची झळ पोहोचल्यास देखील त्या बंधार्यातील पाण्याचा उपयोग होवू शकतो. आ.चंदूभाई पटेल यांनी या सर्व बाबी ना.नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
ना.गडकरी यांच्याकडून तत्वतः मान्यता
ना.नितीन गडकरी यांच्याकडे सध्या परिवहन, भूपृष्ठ विभाग आणि जलसंपदा विभागाची देखील जबाबदारी आहे. थोडाफार अधिकचा खर्च करून दोन्ही उद्देश साधणे शक्य होत आहे. देशात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामध्ये आपण सध्या बंधारा कम पूल संकल्पना राबवित असून जळगाव शहरात देखील बंधारा कम पूल बांधण्यात येईल यासाठी ना.नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. तसेच चौपदरीकरणाच्या कामाला लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे देखील सांगितले. दरम्यान, पुलासोबत बंधार्याची संकल्पना मांडण्याची अनेक दिवसांपासून जल संधारण विभागाकडून देण्यात आले होते. मात्र आता शहरात होणार्या या चौपदरीकरणामुळे या बांधार्याची निर्मीती झाल्यास गिरणा परीसरातील शेतकर्यांना याचा लाभ मिळणार आहे.