छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी घडविले बॉम्बस्फोट

0

रायपूर – छत्तीसगडमध्ये विधासभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांकडून हिंसाचार केला जात आहे. आज रविवारी सकाळी कांकेर येथे नक्षलवाद्यांनी बीएसएफला लक्ष्य करून सहा बॉम्बस्फोट घडविले आहे. तसेच बीजापूर येथे सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आले आहे, तर एकाला अटक करण्यात आली. विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्याचे छडयंत्र नक्षलवाद्यांनी आखले असून, गेल्या दहा दिवसांमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलग्रस्त बस्तर भागातून 300 हून अधिक आयईडी जप्त केले आहेत.

आज सकाळी नक्षलवाद्यांनी बीएसएफच्या गस्तीपथकावर पथकावर आयईडीद्वारे हल्ला केला. यादरम्यान, नक्षलवाद्यांनी सहा स्फोट घडवून आणले. या हल्ल्यात एएसआय महेंद्र सिंह जखमी झाले आहेत. बीएसएफचे गस्तीपथक रविवारी सकाळी कोयलीबेडा परिसरात गस्तीसाठी निघाले होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. दरम्यान जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

दुसरीकडे बीजापूर जिल्ह्यात माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका माओवाद्याला कंठस्नान घातले आहे. तर एकाला जिवंत पकडले आहे. या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे.