रायपुर-देशातील ५ राज्यांमध्ये निवडणुका होत आहे. दरम्यान छत्तीसगढमध्ये मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते रमणसिंह यांच्याविरोधात काँग्रेसने एक तगडा उमेदवार दिला आहे. रमणसिंहांना मात देण्यासाठी काँग्रेसने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची पुतणी करुणा शुक्ला यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. काँग्रेस उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली त्यानुसार आता राजनंदगाव येथून रमणसिंह आणि करुणा शुक्ला यांच्यात कांटे की टक्कर होणार आहे.
भारतीय जनता पक्षाने आपली विचारसरणी आणि संस्कृती गमावल्याने आपण भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याचे करुणा शुक्ला यांनी म्हटले आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण अडवाणी यांनी भाजपा स्थापन केली. मात्र, आज त्यांनाच पक्ष विचारत नाही. भाजपाने आपली मुळ विचारधारा आणि संस्कृती गमावली असल्याने गेल्या ३२ वर्षांपासून असलेले पक्षाचे सदस्यत्व आपण सोडल्याचे शुक्ला यांनी सांगितले.
डॉ. रमणसिंह छत्तीसगढमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. गेल्या १० वर्षांपासून ते राजनंदगाव येथून आमदार म्हणून निवडून येत आहेत. मात्र, त्यांनी या मतदारसंघातून जनतेच्या विकासासाठी काहीही केले नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्याला राजनंदगावच्या लोकांसाठी लढण्यासाठी येथे पाठवल्याचे करुणा शुक्ला यांनी म्हटले आहे.
काँग्रेसमध्ये येण्याआधी करुणा शुक्ला या भाजपाच्या खासदार राहिल्या आहेत. पक्षामध्ये उपेक्षा होत असल्याचा आरोप करीत त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९३ मध्ये त्या पहिल्यांदा विधानसभा सदस्य बनल्या होत्या. त्यानंतर २००४ मध्ये त्या जांजगीर मतदारसंघातून निवडूण आल्या होत्या. दरम्यान, २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत चरणदास महंत यांच्याकडून त्यांना हार पत्करावी लागली होती. भाजपात असताना त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे.