छत्तीसगडमध्ये 10 नक्षल्यांचा खात्मा

0

महाराष्ट्रापाठोपाठ छत्तीसगडमध्येही जोरदार मोहीम

बीजापूर : महाराष्ट्रापाठोपाठ छत्तीसगड पोलिसांनीही नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. बीजापूर जिल्ह्यात छत्तीसगड व तेलंगणा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. त्यापैकी सात नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती आले असून, रात्रभर जंगल परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली होती.

तब्बल दोन तांस चालली चकमक
बीजापूरचे पोलिस अधीक्षक मोहित गर्ग यांनी सांगितले, की जंगलात काही नक्षलवादी लपून बसले असल्याची गुप्तचरांमार्फत खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आयपेंटा गावानजीकच्या जंगलाला पोलिसांच्या विशेष दलाने वेढा घातला. तेलंगणा पोलिसांच्या नक्षलवादविरोधी स्पेशल फोर्सलाही याबाबत माहिती देण्यात आली. दोन्ही पोलिसांच्या पथकांनी जंगलात शोधमोहीम सुरु केली असता त्यांची शुक्रवारी सकाळी नक्षलवाद्यांशी जोरदार चकमक उडाली. नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. परंतु, त्यांनी थेट गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल झालेल्या कारवाईत 10 नक्षलवादी मारले गेले. जवळपास दीड ते दोन तांस ही चकमक सुरु होती, अशी माहिती बीजापूर पोलिस अधीक्षकांनी दिली.

मृतांत पाच महिला नक्षलवादी
बस्तरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले, की घटनास्थळी तपासणी केली असता पाच महिला व दोन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळून आले आहेत. तर इतर तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह पळवून नेण्यात आले असावेत, अशी शंका आहे. घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांवरून हे तीनही नक्षलवादी मारले गेले आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतल्यामुळे नक्षलवादी हादरले आहेत. त्यामुळे घनदाट जंगलात लपून बसत आहेत. महाराष्ट्राच्या कोब्रा बटालियनने केलेल्या कारवाईत 17 नक्षलवाद्यांना नुकतेच कंठस्नान घालण्यात आले होते.