छत्रपतींच्या पुतळ्यासाठी बांधकाम मंत्र्यांना सेनेचे साकडे

0

भुसावळ। शहरातील नियोजित जागेवर बाजारपेठ पोलीस स्टेशन शेजारी पालिकेने गेल्या 15 वर्षांपासून ठराव मंजूर करूनदेखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ़ पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी अडचणी येत आहेत.

छत्रपतींचा पुर्णाकृती पुतळा हा विषय संपूर्ण शहरवासीयांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत अनेक तांत्रिक अडचणी पुढे करून या- ना त्या कारणाने पुतळा उभारणीसाठी परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यासाठी मुंबई येथे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगरसेवक मुकेश गुंजाळ व शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन पुतळा उभारणीसाठी येणार्‍या अडचणींबाबात तीन तास सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन दिले. यावर मंत्री शिंदे यांनी लवकरात लवकर शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणीसाठी प्रयत्न करून सहकार्य करणार असल्याचे आश्वासन यावेळी शिष्टमंडळास दिले. शिष्टमंडळात शिवसेना विभाग प्रमुख उमाकांत शर्मा (नमा), युवासेना शहर अधिकारी मिलिंद कापडे, शिवाजी दाभट, हेमंत बर्‍हाटे आदींचा समावेश होता.