‘छत्रपती’चा ऊस खासगी कारखान्याला

0

बारामती । भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकताच (दि.12) झाला. यावेळी दोघांनी छत्रपती कारखान्याच्या परिसरातील सभासदांनी एक टिपरूही इतर कारखान्यांना देऊ नये असे आवाहन केले होते. मात्र, कार्यक्रमानंतर पाच-सहा दिवसांतच जवळपास साठ हजार टन ऊस नजिकच्या एका खासगी साखर कारखान्याने पळविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

आरक्षण भरतीला फाटा
अजित पवार यांनी सहकारी साखर कारखान्यात कामगाराची विनाकारण भरती केली जाते. ती ही वशिल्यावर केली जाते. असे निक्षून सांगितले. मात्र भवानीनगर कारखान्यात अनावश्यक कामगार किती आहेत? हेही सांगण्याची गरज होती त्याचप्रमाणे सहकारी साखर कारखान्यात आरक्षण भरतीला केव्हाच फाटा दिला आहे. याविषयी भाष्य करण्याचे पवारांनी का टाळले? भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्यात आवश्यकतेपेक्षा जास्त कामगार आहेत. हे कारखान्याचे संचालक खासगीत बोलताना कबूल करतात. पण पद्धतशीरपणे अंगलट येणार्‍या बाजू वरवरच्या भाषणात बोलायच्या पण कृतीत काहीच अंमलबजावणी करायची नाही हे सहकाराचे खास वैशिष्ट्य मानले जाते.

काका-पुतण्याचे राजकीय मौन
या कार्यक्रमात दोन्ही पवारांनी अगदी छातीठोकपणे आमचे खासगी साखर कारखाने ऊस नेणार नाहीत असे सांगितले होते. प्रत्यक्षात याच्या उलटेच घडते आहे. असे चित्र काही शेतकर्‍यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या कार्यक्रमात काका-पुतण्यांनी राजकीय मौन बाळगल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ साखर कारखानदारीविषयी केंद्रसरकारची धोरणे चुकीची आहेत, एवढे मोघम वाक्य बोलून त्यांनी राजकीय भाष्य टाळले याबद्दल परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

वास्तवातील आकडेवारी नाही…
माळेगाव साखर कारखाना इतर कारखान्यांपेक्षा जास्त भाव देतो हे सांगताना वास्तवातील आकडेवारी अजित पवारांनी सांगावयास हवी होती, अशीही सभासदांमध्ये चर्चा होती. एकूणच काय तर या कार्यक्रमाने अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

कारखान्याच्या प्रदूषणाविषयी मौन
थोरल्या पवारांनी दिंडीतील प्रदूषणाविषयी माहिती सांगितली. दिल्लीत प्रदुषणाचा प्रचंड धोका तयार झाला असून त्यामुळे माझ्या सहकार्‍यांनी दिल्लीत दहा दिवस येऊ नये असा सल्ला दिला आहे. दिल्लीतल्या मिटींगला जाऊ शकत नाही. धुळीचे कण व धुके हे मोठ्या प्रमाणात आहेत. अशी माहिती दिली मात्र, सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरीजच्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. तसेच कारखान्याच्या बॉयलरमधून कोळशाचे धूलिकण आसपासच्या परिसरात पसरत असतात. त्यामुळे प्रदूषण होतच असते. त्यासाठी साखर कारखान्यांनी दक्षता घेण्याची गरज असून नियोजन करावे हे सांगण्याचे पवार पद्धतशीपणे का विसरले अशीही चर्चा सभासदांमध्ये होते.

कार्यक्रमाचा खर्च वीस लाख
कारखान्याचा कारभार काटकसरीने करावा असे अजित पवार म्हणाले. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या साक्षीने झालेल्या या कार्यक्रमास अक्षरश: लाखोंची उधळपट्टी होताना उघड्या डोळ्यांनी दिसत होते. मग काटकसर नेमकी कशात करायची? असा प्रश्‍न उपस्थित सभासदांना पडला होता. या कार्यक्रमाचा खर्च वीस लाखांच्या पुढे असावा असाही लोकांमध्ये चर्चेचा विषय होता. मग ही सभासदांच्या पैशाची उधळपट्टी नव्हती काय? या प्रश्‍नाचे उत्तर कारखाना प्रशासनाने देणे गरजेचे आहे. कारखान्याची विस्तारवाढ व अठरा मेगावॅट वीजनिर्मितीचे ज्या ठेकेदारांना काम देण्यात आले होते. त्यांच्या वतीने लाखोंच्या जाहिरातींची उधळपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे या ठेकेदारांनी ज्या पद्धतीने उधळपट्टी केली. ही स्वत:च्या खिशातून केली नाही. हे सत्य नाही काय? मग कामाच्या दर्जाविषयी नेमके काय? असे अनेक प्रश्‍न या कार्यक्रमाने उपस्थित केलेले आहेत.