‘छत्रपती’च्या अध्यक्षांचा राजीनामा मंजूर

0

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक

बारामती : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा अमरसिंह घोलप यांनी 3 सप्टेंबर रोजी अचानक राजीनामा दिला होता. घोलप यांनी दिलेला राजीनामा 9 ऑक्टोबर रोजी कारखान्याच्या सभागृहात संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे घोलप यांनी राजीनामा सुपूर्द केला होता. कारखान्याचा गळीप हंगाम अवघ्या वीस दिवसावर आला आहे. अशा परिस्थितीत घोलप यांनी राजीनामा दिल्यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.
कारखान्याच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्यामुळे या नावलौकीक असलेल्या कारखान्याबाबत अनेक प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घोलप हे फार क्वचितच अध्यक्ष कारखान्याच्या असलेल्या केबिनमध्ये बसत असत. सर्वसाधारणत: संचालक मंडळासाठी असलेल्या सभागृहातच घोलप हे सभासदांना भेटत असत. घोलप यांना काम करू न देण्याचा काहींनी चंगच बांधला होता.

संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे आरोप

मागील वर्षी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याच्या संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झालेले होते. या सभेत कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्यावर आरोपांचा भडीमारही झाला होता. गेल्या दोन वर्षापासून कारखान्याच्या कारभारावर अनेक प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. 28 हजार सभासद असलेला हा कारखाना आज अत्यंत अडचणीत आल्यामुळे सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालेले आहे. अशाच परिस्थितीमध्ये अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे एकूणच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत अध्यक्ष घोलप यांनी संचालक मंडळांशी चर्चा करीत राजीनाम्याचे कारण सांगितले. अद्यापही प्रकृतीच्या कारणास्तव पायाची दुखापत वाढल्याने ताणतणाव टाळून विश्रांती घेणे आवश्यक आहे. त्याचसाठी राजीनामा देत आहे, असेही घोलप यांनी यावेळी सांगितले.

गाळप हंगामावर परिणाम

छत्रपती कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम जवळपास महिनाभराने उशिरा सुरू होत आहे. याचा कारखान्याच्या गाळपावर परिणाम होणार असून तब्ब्ल पाच लाख टन ऊस हा खासगी साखर कारखान्यांना पळवता येणार आहे. त्यामुळेच नियोजनात ताळमेळ ठेवला जात नाही. याचा परिणाम सभासदांना ऊस दर देण्यावर होणार आहे. कारखान्याची विस्तारवाढ झाली असली तरी अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. मुळातच आता तर कारखान्याला कारभारीच नाही. त्यामुळे आणखी कठीण परिस्थिती तयार होत आहे. छत्रपती कारखान्याच्या नावलौकीकाला बाधा आणण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या राजीनाम्याने अनेक प्रश्‍न तयार झालेले आहेत.

संचालक म्हणून कार्यरत राहणार

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी संचालक म्हणून आपण कायम कार्यरत राहू, संचालकमंडळांच्या बैठकीसाठी उपस्थित राहून आवश्यक कामकाजात सहभागी होऊ, असेही घोलप यांनी बैठकीत सांगितल्याचे खात्रीपूर्वक समजत आहे.