छत्रपती, छिंदम आणि समस्या

0

कधी गांधी, कधी सरदार पटेल, कधी फुले-आंबेडकर, कधी छत्रपती शिवाजी महाराज तर कधी चक्क नथुराम, नावे फक्त बदलत राहतात. बाकी तीच तर्‍हा, तीच दशा. प्रतिमांचे राजकारण त्या महापुरुषांच्या विचारांनासुद्धा गिळंकृत करून जाते. आपण अर्धवट ग्लानीत कधी जयजयकार, तर कधी निषेध करत राहतो. आज छिंदमच्या नावाने शिमगा करायचा, उद्या दुसरा कुणी असेल. विचार मात्र आधीच पद्धतशीर संपवलेत, हीच खरी समस्या आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म आणि कर्मभूमीतच, कुणी ऐरागैरा त्यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह बरळण्याचे धाडस करतो. छत्रपती शिवाजी आणि त्यांच्या जयंती उत्सवाबद्दल गरळ ओकतो, हे निश्‍चितच धक्कादायक आहे. खरंतर महाराष्ट्रात राहणार्‍या प्रत्येकासाठीच छत्रपती शिवाजी प्रातःस्मरणीय असावेत, अशी बळजबरी कुणी करू शकत नाही. असतात प्रत्येकाच्या श्रद्धा आणि स्वार्थ वेगवेगळे असू शकतात. अगदी छत्रपती हयात असतानासुद्धा सगळेच महाराष्ट्रवासी महाराजांच्याच बाजूने होते अशातला काही भाग नाही. अटकेपार झेंडे वगैरे सगळा खूप नंतरचा किंबहुना पेशवाईचा प्रताप झाला. प्रत्यक्ष शिवरायांच्या काळात महाराष्ट्राच्या पश्‍चिमी भागातील एक भूपट्टा त्यांच्या अखत्यारीत होता. पुण्यात सुरुवात असली तरी तुळजापूर, अहमदनगर, औरंगाबादपर्यंत ते कधी पोहोचले नव्हते. याउलट भारताच्या दक्षिण क्षेत्रात अगदी बंगालच्या उपसागरापर्यंत त्यांच्या अधिपत्त्याचा झेंडा लहरत होता. पण त्याचवेळी तिथेही त्यांच्या आजूबाजूला अनेक स्वतंत्र राज्य अस्तित्वात होती. अगदी त्यांचे स्वतःचे सावत्र बंधू तंजावरचे महाराज व्यंकोजीराजेसुद्धा त्यांच्या विरोधात होते.

आज सरसकट सगळेच मराठा स्वतःला शिवरायांचे वंशज म्हणून मिरवत असले, तरी त्यांच्यातील अनेक जावळीच्या मोर्‍यांच्या खानदानातलेसुद्धा असू शकतील. मुघल, आदिलशाह, विजापूरच्या दरबारातील मराठी सरदार वगैरे तर स्वतंत्र विषय. एकूणच काय तर शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे कोणत्याही जातीय, प्रांतीय अस्मितेहून अधिक राजकीय होते. शासकाने प्रजेवर कशा पद्धतीचे शासन केले पाहिजे, याबद्दल त्यांची ठाम गृहीतके होते. कुल-प्रांताच्या अभिमानापेक्षा जनतेचा उद्धार त्यांच्यासाठी जास्त मोलाचा होता आणि म्हणूनच एका छोट्याशा साम्राज्याचे अधिपती असूनही छत्रपती शिवाजी कालातीत, वादातीत महापुरुष ठरले, अशा या शिवरायांना रोज उठून वंदन नाही केले तरी चालेल, पण त्यांचा उपमर्द करण्याची आपली लायकी नाही हे निश्‍चित. नगरच्या उपमहापौरांना मात्र याचे भान राहिले नाही. खरंतर हा दोष त्यांचा एकट्याचा नाही, आज घडीच्या सगळ्याच राजकीय नेत्यांच्या मानसिकतेचा आहे. आपल्याकडे लोकशाही असली तरी ती प्रत्यक्षात नाममात्र. इथे लोक मतदान निश्‍चितच करतात, पण ते स्वतःच्या पूर्ण विचारांनी नाही. कुठल्यातरी अमिषापायी, कुठल्यातरी तकलादू अस्मितेपायी मतदान करणार्‍यांची संख्या आजही मोठी आहे. आजतर परकीय कंपन्यांना अब्जावधींचे कंत्राट देऊन प्रचार यंत्रणा राबवण्याचे फॅड आले आहे. देशाची मानसिकता आणि सत्तेचा निर्णय अशा कुणा परदेशातील शक्तीच्या ताब्यात जात असेल तर पारतंत्र्य याहून वेगळे काय असते. 1947 पूर्वी काही शतके इंग्रज इथले सत्ताधारी होते. आता स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी आपण परकीय कंपन्यांच्या चमच्याने पाणी पितोय, मग एवढा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा लढून आपण नेमके काय मिळवले.

जागतिकीकरण वगैरे सगळे ठीक आहे, पण आपली भूमी, इथली माणसं इथल्या परंपरा-वारसा हे सगळेदेखील याच जगाचा भाग आहे. मग ते सोडून पश्‍चिमेकडे धावत सुटायचे कारण काय? कारण फक्त एकच आपल्या राजकीय नेत्यांची वृत्ती. इथे कुणाला नवीन काही करण्यात रस नाही. काही ठरावीक कंपन्या, त्यातून मिळणारा आर्थिक लाभ, आणि त्या लाभातून इथल्या जनतेवर करता येणारी सत्ता एवढेच एकमात्र सूत्र शेष आहे. म्हणून तर रस्त्यांची करोडोंची कंत्राटे निघतात, मेट्रो-बुलेटची स्वप्न पडतात, कर्जमाफीही जाहीर होते, पण शिक्षण आणि सिंचनावर खर्च करायला पैसा नसतो. एकीकडे कॉर्पोरेट कंपन्यांच्या शाळांसमोर रांगा लागतात, तर सरकारी शाळा सोयीसुविधांअभावी गचके खातात. ’गुरूदेवो भव।’मधला गुरू काळाच्या ओघात येडपट विनोदी मास्तर होऊन बसतो. योजना तर शंभर जाहीर होतात, पण प्रत्यक्षात बडा वशिला असल्याशिवाय – हात ओले केल्याशिवाय, नवउद्योग उभारणे कठीण होऊन बसते. शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या की सहानुभूतीचा पूर येतो, पण तो आत्मनिर्भर होऊ शकेल, अशी व्यवस्थाच उभी राहत नाही. अस्मितेचे अंगारे इतके पेटवले जातात, की जगण्यासाठी हातपाय मारावे लागतात याची जाणीवच भस्मसात होते. कोवळ्या हातात पाटी पुस्तकांऐवजी दगड दिले जातात. उद्या आरक्षणातून, वशिल्यातून, प्रकल्पग्रस्त – भूमिपुत्र कोट्यातून किंवा इतर कुठल्याही मार्गाने नोकरीची दारे उघडली तरी शिक्षणाअभावी चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करण्याशिवाय पर्याय उरत नाही. लोक जिथल्या तिथे खितपत राहतात. श्रीमंत-गरीब दरी विस्तारत राहते आणि या दरीचे भांडवल करून पुढची अनेक वर्षे प्रस्थापितांचे राज्य सुखनैव नांदत राहते.

– सृष्टी गुजराथी
मुक्त पत्रकार, लेखिका मुंबई
9867298771