देशातील समाजसुधारकांच्या यादीत शाहू राजेंच्या स्त्री स्वतंत्र, शिक्षण, अस्पृश्यता, जातीवाद, या बहुजन समाजाला बुरसटलेल्या विचारांवर प्रहार करत या देशातील बहुजन समाजाला समानतेचे जीवन देणार्या कार्यामुळे अग्रस्थानी आढळते. समानता, बंधुता एकात्मता ज्यांच्या कृतिशील कार्यातून या समाजाला शिकवण मिळाली, असे क्रांतिसुक्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज. छत्रपती शिवरायांच्या रक्ताचेच नव्हे, तर विचारांचे वारस ठरवून या देशाला समानतेचा संदेश देऊन जातिभेद, वर्ण भेद, अस्पृश्यता यात बुरसटलेल्या समाजाला एक नवी दिशा देऊन, या बहुजन समाजात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणारे एक महान जाणता राजा. गंगाराम कांबळे या महार समाजातल्या व्यक्तीला ’सत्यसुधारक हॉटेल टाकून देऊन’ व शाहू राजे स्वतः त्यांच्या हॉटेलमध्ये चहा पीत, असे कृतिशील कार्यातून शाहू राजेंनी अस्पृश्यता समजल्या जाणार्या धारणेला कलाटणी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज हे राजकीय स्वातंत्र्याचे यशस्वी नायक होते, तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक समतेचे लढवय्ये होते. प्रत्येक महापुरुषांचा वैचारिक मार्ग वेगळा असतो म्हणून त्यांना सनातनी परंपरावादी विरोध करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी गुलामगिरीविरोधी स्वतंत्रतेचा लढा दिला, तर छत्रपती शाहू महाराज यांनी जातीयवादी विरोधी समानतेचा लढा दिला.त्याच बरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे कार्य आहे, शिक्षणामुळे समाज विकसित होतो, ही त्यांची धारणा होती. समाजात अस्पृश्य समाजाला शिक्षणापासून दूर असलेल्या काहींच्या जन्मजाती गुंड, डाकू, असे ओळख असलेल्या फासेपारधी समाजाला, दलित समाजाला, शिक्षणासाठी सर्व दारे खुले केले, मराठा, दलित, धनगर, पारधी, अस्पृश्य समजल्या जाणार्या अशा 22 विविध जातींसाठी वसतिगृह स्थापन करून कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत मुलींना मोफत शिक्षण दिले. मुलींना मोफत शिक्षण देणारे हे पहिले राजे होते. शैक्षणिक कार्यात शाहू राजेंनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहिले, प्राथमिक शिक्षणाबरोबरच राजाराम महाविद्यालयाची स्थापना करून उच्चशिक्षणाची पायाभरणी केली. 1919 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराजांनी भेट घेऊन, नागपूर येथील अस्पृश्य निवारण सभेत अस्पृश्याला त्यांचा खरा पुढारी मिळाला, असे सांगत बाबासाहेबांचं गौरव केला, बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातून मदत केली. समाजाला जर प्रवाहात आणायचे असल्यास, देशाच्या उन्नतीसाठी शिक्षणाशिवाय ते शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत, शिक्षणासाठी आपली तडजोड दाखवली.
समाजाला शिक्षणाबरोबरच आंतरजातीय विवाहासही मान्यता देऊन आपापसात असलेले जातीयभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. शाहू राजे हे कृतीशील विचारवंत होते. त्यांनी केवळ भाषणे आणि कायदा करून विषय सोडून दिला नाही. त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली. आपली चुलत बहीण चंद्रप्रभाबाई यांचा विवाह इंदूरच्या तुकोजीराव होळकरांचे पुत्र यशवंतराव यांच्याशी करून समाजात आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले, स्त्री केवळ समाजात समज असलेली भोगवस्तूच नसून, तिलाही समाजात समान अधिकार, मानसन्मान मिळाला पाहिजे. या विचाराचेही शाहू महाराज होते. म्हणून विधवा महिलेस पुनर्विवाहास मान्यता दिली. त्यांच्या कृतिशील कार्याचा कार्यभार आज समाजात वावरताना अनेकदा स्पर्शून जातात. आज या महान विश्ववंदनीय छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
– श्रीपाद नागनाथ राऊतवाड, नांदेड
8007870026