छत्रपती शाहू महाराज रूग्णालय ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर देणार

0

जळगाव। छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात कर्मचारी, वाहनचालक, परिचारीका, डॉक्टर यांची एकूण संख्या 93 असून त्यांच्या पगारावर होणारा मासिक खर्च 28 लाख 31 हजार 556 इतका असून अद्याप ही दवाखाने विभाग यांचेकडील मागणीनुसार वैद्यकीय अधिकारी पदे 08, हेल्थपोस्ट पदे 04, लसीकरण पद 01, परिचारीका 51 पदे अशी रिक्त असून यामुळे समाधानकारक सेवा देण्यासंदर्भांत अडचणी निर्माण होत असल्याचे पत्र महापौर नितीन लढ्ढा यांनी आयुक्तांना दिले आहे.

अत्याधुनिक सुविधा देण्यास असमर्थ
ही सर्व पदे कायमस्वरूपी भरल्यास मोठ्या प्रमाणावर आस्थापना खर्चांमध्ये अजून मोठ्या प्रमाणावर वाढ होईल या उपरांत सद्यस्थितीत महानगरपालिका फक्त प्रसुती, बाह्यरूग्ण व रक्तचाचण्या याच सेवा पुरवीत असून महागड्या व अत्याधुनिक मशिनरी, उदा.सिटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे, शस्त्रक्रिया याबाबी पुरविणे संदर्भांत असमर्थ असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. या सर्व बाबींमुळे सदरहू दवाखाने सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिका ज्या सेवा ज्या दरात पुरवित आहे त्या सर्व सेवा सदरहू सेवाभावी संस्थेस पुरविणे बंधनकारक राहणार आहे.

दोन स्वयंसेवी संस्थांनी दाखविली तयारी

महानगरपालिकेचे साधरणतः 30 लाख रूपये महिन्याला वाचणार असल्याने 29 एप्रिल 2017 रोजी महासभेने ठराव क्र. 648 अन्वये धोरणात्मक निर्णय घेवून व्यापक प्रसिद्धी वृत्तपत्रात देवून देकार मागविले होते. यानुसार महानगरपालिकेस दोन संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून यासंदर्भांत योग्य निर्णय लवकर घेणे अपेक्षित असून यामुळे या सेवाभावी संस्थेद्वारा दर्जेदार सेवा सामान्य नागरिकांना उपलब्ध होवून महानगरपालिकेचे मोठे आर्थिक हित जोपासले जाईल. जळगाव पिपल्स्स को-ऑप बँक संचलीत रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टतर्फे शाहूनगर रूग्णालयात चालविण्यात येणारे प्रसुतीगृह, बाह्यरूग्ण विभाग चालविण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच ना नफा ना ताटा तत्त्वांवर बालरोग विभाग, नाक, कान, घसा विभाग, नेत्ररोग विभाग, दंतरोग विभाग, अस्थीरोग विभाग, फिजीओथेरॅपी विभागा सुरू करण्याचा मानस दर्शविला आहे.