जळगाव। तांबापुरा झोपडपट्टीतील अजमेरी गल्लीत पावसाचे पाणी घरात शिरू नये म्हणून घरावरील पत्र्यावर प्लॉस्टीक ताडपत्री टाकतांना छत कोसळून झोळीतील दिड वर्षीय बालकाचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली. असद रऊप पटेल असे मयत बालकाचे नाव आहे. तांबापुरा अजमेरी गल्लीतील रहिवासी रऊफ पटेल रविवारचा दिवस आणि पावसाने उसंत घेतल्याने छतावर प्लॉटीक टाकत होते. अचानक घराची बल्ली तुटल्याने संपुर्ण छत खाली कोसळून दुर्घटना घडल्याने गल्लीतील महिला पुरुषांनी मदतीसाठी धाव घेतली होती. रहिवाश्यांनी जखमी पित्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. परंतू, छत कोसळल्याने दगड छातीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
मन हेलावून टाकणारा आक्रोश
हुमेरा आणि रोजमीन या दोन बहिणींचा असद हा एकुलता एक भाऊ होता. कुटुंबियांसह परिसरातील नागरीकांचाही तो लाडका होता. ही दुर्देवी घटना घडल्यानंतर कुटुंबियांसह नागरीकांनी प्रचंड आक्रोश केला. असदच्या जन्मानंतर तो काही महिने सतत आजारी राहत होता. दोन-तीन महिन्यांपूर्वीच त्याची प्रकृती पुर्णपणे बरी झाली होती. त्यामुळे कुटुंबिय देखील आनंदात होते. रविवारी घटना घडण्याच्या काही मिनीटे आधी कुटुंबियांनी त्याला जेवण खाऊ घातले होते. नंतर लागलीच त्याला झोप आल्यामुळे झोक्यात टाकण्यात आले. अगदी काही मिनिटांच्या या घडामोडीनंतर घडलेल्या दूर्देवी घटनेत असदचा मृत्यू झाला.
वरुन दगड पडला बाळाच्या छातीवर
तांबापुरातील अजमेरी गल्लीत रऊफ हकीम पटेल(वय-30)पत्नी साजेदाबी, मुली हुमेरा(वय-5), रोजमीन(वय-3) आणि मुलगा असद यांच्यासह वास्तव्यास आहे. रद्दी-भंगार गोळा करुन कुटूंबाची गुजराण चालवत होते. पावसाळा सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासून छत गळत होते. रात्री जोरात पाऊस आला तरी घरात झोपता येईना, म्हणुन छतावर टाकण्यासाठी प्लॉस्टीक ताडपत्री मिळवून ती रविवार उसंतीचा दिवस म्हणुन दुपारी एक वाजता असदचे वडील रऊप पटेल यांचे जेवण झाल्यानंतर ते घराबाहेर आले. यावेळी मागच्या खोलीत त्यांच्या पत्नी साजेदा बी, आई मेहमुदाबी, मुली हुमेरा व रोजमीन हे जेवण करीत होते. रऊप बाहेर आल्यानंतर प्लास्टीकचा कागद टाकण्यासाठी छतावर चढले. कागद टाकत असतनाच पत्र्याला आधार देणारी कुजलेली बल्ली तुटली. दुर्देवाने याच बल्लीला असदचा झोका बांधलेला होता. बल्ली तुटल्यामुळे छतावरील पत्रे व दगड खाली कोसळले. यातील काही दगड झोक्यात झोपलेल्या असदच्या छातीत पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. काही मिनीटातच त्याची प्राणज्योत मालावली.
कोसळलेले रऊफ पटेल दवाखान्यात
या घटनेत असदचे वडील हे देखील छतावरून खाली कोसळले. त्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमी अवस्थेतील असदला नागरीकांनी तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातून रऊफ पटेल यांना डॉ.भंगाळे यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातच दुर्घटनेच्या कारणांचा तपास पोलिसांकडून होणार आहे.
घटनेनंतर प्रचंड गर्दी
छत कोसळून दगड छातीत पडल्याने असदचा मृत्यू होवून घटना परिसराच पसराताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाप-लेकास बाहेर काढले. याप्रसंगी महिला व रहिवाश्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांनाही घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बाप-लेकास जिल्हा सामान्य रूग्णालयात आणल्यानंतरही नातेवाईक, नागरीकांची गर्दी झाली होती. यावेळी नातेवाईकांनी व कुटूंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला होता. तर संपूर्ण तांबापुरा परिसर असद या दिड वर्षीय चिमुकल्याच्या दूर्दैवी मृत्यूमुळे सुन्न झाले होते. ऐन पावसाळ्यात घरावरील छताची डागडुजी करतांना झालेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.