भुसावळ : शहरातील संतधाम जवळील रहिवासी व अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या काजल योगेश डोळे (21) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली होती. सासरच्या छळास कंटाळून आपल्या बहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप मृत विवाहितेचा भाऊ पंकज याने करीत बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून मयत विवाहितेचा पती, सासू, सासरे आणि दिराविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, मयत विवाहिता तीन महिन्यांची गर्भवती असल्याने तिच्यासह बाळाचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.
घरासाठी पैसे न आणल्याने छळाचा आरोप
आरोपी पती असलेल्या योगेश डोळेचे 12 डिसेंबर 2019 रोजी बामणोद येथील काजलशी लग्न झाल्यानंतर घर घेण्यासाठी दोन लाख आणावेत म्हणून पतीसह सासू, सासरे, दिर हे विवाहितेला शारीरीक व मानसिक त्रास देत होते. याबाबत विवाहितेने माहेरी तिचा भाऊ पंकज आणि वडीलांना छळाबद्दल माहिती दिली मात्र छळ असह्य झाल्याने आपल्या बहिणीने गळफास घेत आत्महत्या केली, अशी तक्रार मयताचा भाऊ पंकजने दिल्यावरून आरोपी पती योगेश आत्माराम डोळे, सासू विमलबाई आत्माराम डोळे, सासरे आत्माराम डोळे व दीर अनिल आत्माराम डोळे (सर्व रा. दुर्गा कॉलनी, संतधाम, भुसावळ) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. मृत काजल हिचे माहेर बामणोद (ता.यावल) असून तिच्या मृत्यूनंतर गावातही हळहळ व्यक्त करण्यात आली.