अहमदनगर/पुणे : ऊसदर आंदोलन हाताळण्यात चूक झाल्याची कबुली देतानाच, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी संतापजनक वक्तव्य करून शेतकरी जनतेला घायाळ केले आहे. पोलिस ऊसदर आंदोलक शेतकर्यांच्या पायावर गोळी मारु शकत होते. पण, ती गोळी छातीत लागली, हे चुकीचेच आहे, असे असंवेदनशील विधान दानवे यांनी नगर येथे केले. पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकरी आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या दानवेंनी हे विधान केले. त्यामुळे दानवे हे जखमींचे दु:ख कमी करायला नाही, तर शेतकर्यांच्या जखमांवर मीठ चोळायला आले होते, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकर्यांनी व्यक्त केल्यात. दुसरीकडे, सत्तेत येऊन तीन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले. शेतकर्यांना आजही आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे आणि रस्त्यावर उतरलेल्या शेतकर्यांच्या छातीत गोळी मारण्यापेक्षा पायावर गोळी मारु शकले असते, असे विधान करणारे हे सरकार शेतकर्याला काय न्याय देतील? अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त पुणे शहरात आयोजित कार्यक्रमासाठी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आ. माणिकराव ठाकरे, आ. हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.
जखमी शेतकर्यांना एक लाखाची मदत
नगर येथे बोलताना खा. दानवे म्हणाले, गोळीबार हा काही छातीवर करायचा नसतो. परंतु, जमावामध्ये अशाप्रकारे जी गोळी लागली, ती चुकीची मारली गेली. पायावर गोळी मारु शकत होते. परंतु ती गोळी छातीत लागली, हे चुकीचेच आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहखाते सांभळण्यास सुरुवात केल्यानंतर हा पहिलाच गोळीबार आहे. अशाप्रकारचा गोळीबार पुढच्या काळात होणार नाही, अशी खात्री ते बाळगतील. आमची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी या विषयावर आम्ही चर्चा करु, असेही दानवे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची किंवा गृहखाते वेगळे करण्याची गरज नसल्याचेही दानवे म्हणाले. ऊसदर आंदोलनात गोळीबारात जखमी झालेल्या दोघांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ. शिवाय, शेतकर्यांना न्याय देण्यात येईल, असे आश्वासनही दानवे यांनी यावेळी दिले. शेवगाव तालुक्यातील घोटण व खानापूर परिसरात ऊसदर वाढीसाठी शेतकर्यांनी आंदोलन व रस्तारोको केला होता. यावेळी आंदोलक शेतकर्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले आहेत.