छायाचित्रकारांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे

0

नितीन पाटील यांचे आवाहन; छायाचित्रदिनानिमित्त आयोजन
नंदुरबार – फोटोग्राफी ही कला आहे, बदलत्या काळाप्रमाणे फोटोग्राफर बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे प्रतिपादन प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी केले. फोटोग्राफी दिनानिमित्त जिल्हा प्रोफेशनल फोटोग्राफर असोसिएशन व जिल्हा प्रेस फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात कॅमेरा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. त्यानंतर मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना फळवाटप व मिष्टान्न वाटप ज्येष्ठ फोटोग्राफर संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

उपस्थितांनी मांडले विचार
या कार्यक्रम साठी ज्येष्ठ फोटोग्राफर रमेश पाटील प्रोफेशनल फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष राकेश तांबोळी प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पाटील, सुनील कुलकर्णी, सूर्यकांत खैरनार, माजी अध्यक्ष मानसिंग राजपूत, गोविंद अग्रवाल, उपाध्यक्ष वैभव थोरात, रामलाल मिश्रा, योगेश शिंपी, संजय तांबोळी, ज्येष्ठ पत्रकार रणजीत राजपूत, संदीप महाजन, अविनाश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रणजीत राजपूत यांनी फोटोग्राफीतील बदलाबाबत माहिती दिली. राकेश तांबोळी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. मानसिंग राजपूत यांनी सांगितले की स्वतः वेदना विसरून दुसर्‍याचे हास्य टिपण्याचा प्रयत्न छायाचित्रकार करीत असतो. गोविंद अग्रवाल यांनी सांगितले की, सर्व फोटोग्राफर बांधवांनी एकत्र येऊन चांगले उपक्रम राबवावे. वैभव थोरात व रमेश पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पुणे येथे राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत बक्षीस मिळाल्याबद्दल छायाचित्रकार नितीन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच नवापूर येथे अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादू हिरणवाळे यांनी केले. संघटनेचे सचिव भूषण पाठक यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमाला फोटोग्राफर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.