छायाचित्रकार डॉ. महेश खर्डे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

0

मुंबई । प्रसिद्ध छायाचित्रकार डॉ. महेश खर्डे यांनी कॅमेराबद्ध केलेल्या समकालीन जीवनदर्शन या विषयावर आधारित अप्रतिम छायाचित्रांचे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीमधील टेरेस आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन रसिकांना 12 एप्रिलपासून पाहावयास मिळत असून, 18 एप्रिलपर्यंत ही संधी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत उपलब्ध आहे. प्रस्तुत प्रदर्शनात डॉ. महेश खर्डे यांनी भारतातील अनेक प्राचीन किल्ले, महाले व ऐतिहासिक वैशिष्ट्ये दर्शवणार्‍या वास्तूंचे, नागरी जीवनाचे व त्यातील वैविध्यपूर्ण व गतिमान जीवनशैलीचे, सृष्टीसौंदर्याची विविध प्राकृतिक रुपे दाखवणार्‍या छायाचित्रांचे सादरीकरण केले आहे.

डॉ. महेश खर्डे हे मुंबईतील एक नामवंत शल्य विशारद असून, गेली अनेक वर्षे ते विरार येथील स्वत:च्या इस्पितळात प्रॅक्टिस करीत आहे. डॉ. महेश खर्डे यांनी आपल्या या प्रदर्शनात कॅनन डीएसएलआर हा कॅमेरा व आयफोनचा वापर करून काढलेली विविध छायाचित्रे मनमोहक व आकर्षक आहेत. राजस्थानातील किल्ले, देवळे, महाल, निसर्ग व सृष्टीसौंदर्याची अनेक रम्य व मनोहर रुपे त्यांनी आपल्या कॅमेर्‍याने आणि आयफोनने टिपून या प्रदर्शनात सादर केली आहेत.