छायाचित्रणासाठी सकारात्मक निरीक्षणशक्ती गरजेची : महामुनी

0

पुणे । पर्यावरणविषयक छायाचित्रातून पर्यावरण संवर्धनासाठी जागृती होणार आहे. परंतु याकरीता प्रत्येक छायाचित्रकाराकडे छायाचित्रणाकरीता सकारात्मक निरीक्षणशक्ती असणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ छायाचित्रकार व फर्ग्युसन महाविद्यालय फोटोग्राफी विभागाचे प्रमुख राजेंद्र महामुनी यांनी व्यक्त केले. इकोफोक्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे आयोजित फोटोथॉन 2018 या छायाचित्रण स्पर्धेचे घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात झाले. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार भरत डोर्ले, आशिष व्यास, भूपेंदर रंधवा, आयोजक परेश पिंपळे, गजानन पाटील आदी उपस्थित होते.फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे फोटोग्राफी लव्हर्स संस्थेचे स्पर्धेला सहकार्य मिळाले. स्पर्धेचे परिक्षण नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचे संपादक मुकेश पारपियानी आणि बेटर फोटोग्राफी मॅगझीनचे संपादक माधवन पिल्लई करणार आहेत. गजानन पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

राजेंद्र महामुनी म्हणाले, छायाचित्रणाच्या माध्यमातून तरुणाई पर्यावरण संवर्धनाच्या जनजागृतीकरिता पुढाकार घेत असल्याचे कौतुकास्पद आहे. पर्यावरणाच्या विविध चांगल्या छटा कॅमेर्‍याच्या माध्यमातून सुयोग्य मार्गाने दाखविणे हे छायाचित्रकाराचे कौशल्य आहे. डोर्ले म्हणाले, एक हजार शब्द हे एका छायाचित्रातून बोलत असतात. त्यामुळे छायाचित्रकारांसाठी हे उत्तम माध्यम आहे. छायाचित्रकारांकडे ज्ञान व कष्ट करण्याची तयारी असायला हवी. तर पर्यावरणासारख्या सार्वजनिक विषयांवर ते समाजात चांगली जनजागृती करू शकतील.

सामान्यांचाही सहभाग
पर्यावरणाचे जतन करीत त्याचे महत्त्व छायाचित्रांच्या माध्यमातून पटवून देण्यासाठी आयोजित स्पर्धेत पुणेकरांनी बहुसंख्येने सहभाग घेतला. शिकाऊ, व्यावसायिक आणि मोबाईलद्वारे छायाचित्र काढणार्‍या हौशी स्पर्धकांसह सामान्यांनीदेखील आपल्या नजरेतून पर्यावरण दाखविण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या तोडीसतोड पुण्यामध्ये छायाचित्रकार आहेत. त्यांच्याकडून पर्यावरणासारख्या अनेक विषयांवर उत्तम दर्जाचे छायाचित्रण होते. फोटोथॉनची संकल्पना निराळी असून अशा नेमून दिलेल्या 24 तासाच्या कालावधीतील छायाचित्रणाच्या फोटो मॅरेथॉनसारख्या स्पर्धा छायाचित्रकारांना उत्तम व्यासपीठ मिळवून देतील, असे महामुनी यावेळी म्हणाले.