छिंदमला मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल

0

अहमदनगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला मारहाण करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक योगिराज गाडे, अमोल उर्फ ज्ञानेश्वर येवले, विजय पठारे, अनिल शिंदे व अन्य चार जणांविरुद्ध शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी स्वत: श्रीपाद छिंदमने फिर्याद दाखल केली होती.

अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकांवेळी श्रीपाद छिंदमने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांनी सभागृहातच छिंदमला मारहाण केली होती.

छिंदमने नगरसेवक योगिराज गाडे, अमोल उर्फ ज्ञानेश्वर येवले, विजय पठारे, अनिल शिंदे व अन्य चार अशा आठ जणांविरुद्ध मारहाण करणे, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे या कलमानुसार फिर्याद दिली. त्यानुसार येथील तोफखाना पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, नगरसेवक गाडे व इतर नगसेवक छिंदमवर धावून आले. त्याला हाताने मारण्यास सुरुवात केली. त्याचा चष्मा फोडला. तो धावत पिठासीन अधिकारी द्विवेदी यांच्याकडे गेला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या नगरसेवकांनी शिवीगाळ करत मला व माझ्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली, असे छिंदमने फिर्यादीत म्हटले आहे. तसेच मारहाण करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही छिंदमने केली.