छिंदम नावाची विकृती!

0

अहमदनगर महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचा पदच्युत उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवरायांबद्दल जी गरळ ओकली, ही त्याची कृती क्षम्य नाही. एका इतिहास थोरपुरुषांबद्दल तो ज्या पद्धतीने बोलला त्याबद्दल त्याला शिक्षा ही मिळायलाच हवी. तद्वतच त्याने उभ्या महाराष्ट्राचे मन दुखावले आहे. या छिंदमला राज्यातून तडीपार करणे आणि अशी विकृती पुन्हा या राज्यात जन्माला येणार नाही, याचा बंदोबस्त करणे, ही काळाची गरज आहे.

भारतातील लोकप्रिय राजांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. उभ्या महाराष्ट्राचे तर ते आराध्य दैवतच आहे. विविध जाती-धर्माची माणसे त्यांना आपला आदर्श राजा मानतात, किंबहुना महाराष्ट्राचे ते भूषण आहेत. ज्या महानायकांनी आपल्या कर्तृत्वाची अमिट छाप इतिहासावर कोरली, त्या नायकांमध्ये शिवरायांचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले गेले आहे. नेहमीच असे सांगितले जाते, की इतिहास ही विजेत्यांची कथा असते. परंतु, जेव्हा माणसांच्या नव्या पिढ्या हा इतिहास वाचतात तेव्हा या पिढ्या या बाबींचे अवश्य आकलन करतात की, कोणत्या शासकाने कसे शासन केले. त्या पिढ्यांना शिवराय हे राष्ट्रपुरुष वाटत राहतात.

भारताचा देदीप्यमान इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. शिवराय हे आमचे ऊर्जास्थानच नाही तर आत्मा आहेत. प्रेरणा आणि आदर्श ज्यांच्याकडून घ्यावा, यासाठी शिवरायांपेक्षा वेगळे दैवत आज तरी महाराष्ट्रासमोर अन्य कुणीही नाही. ज्यांनी इतिहासावर ठसा उमटवला, त्यात शिवराय हे अग्रस्थानी आहेत, त्यानंतर हा देश सम्राट अशोक किंवा सम्राट अकबर यांना ओळखतो. शिवराय हे महान योद्धा होते, त्यांनी स्वहिकमतीवर स्वतःची सेना उभी केली, त्यांनी लढलेली युद्धे ही नीती आणि धर्माची युद्धे होती. त्यातून स्वराज्य निर्माण केले. हे राज्य अठरापगड जाती, विविध धर्माची माणसे आणि उपेक्षितवर्ग यांना आपले वाटत होते. रयतेवर आईच्या हृदयाने प्रेम करणारा असा राजा यापूर्वी कधी झाला नाही, अन् भविष्यातही होणे नाही. त्यामुळेच आज शेकडो वर्षानंतरही शिवराय प्रत्येकाच्या हृदयात अढळस्थानी आहेत. ते एक महान योद्धा होते त्यांनी जगाला थक्क करणारी नवीन युद्धनीती निर्माण केली. कुशल रणनीतीकार, सर्वोत्कृष्ट प्रशासक आणि रयतेचा राजा म्हणून केवळ भारतच नव्हे, तर अख्खे जग त्यांना ओळखते. महाराष्ट्राचे म्हणाल तर या राज्यात जन्माला येणारे बाळ सर्वात पहिल्यांदा काही ऐकत असेल तर तो शिवरायांचा जयजयकार ऐकते. शिवरायांचा जयजयकार करत अनेक पिढ्या लहानच्या मोठ्या झाल्यात. आजही छत्रपती शिवाजी महाराज की? असे म्हटले तरी प्रत्येकाच्या तोंडातून ‘जय’ असा शब्द बाहेर पडतो. हे या मातीतील प्रत्येकावर झालेले संस्कार आहेत. परंतु, श्रीपाद छिंदम याचासारखा विकृत आणि समाजाला कलंक असलेला व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार होऊनही छत्रपतींचा सन्मान कसा करावा हे शिकत नसेल तर त्याच्या विकृतीची परिसीमा झाली, असा त्याचा अर्थ घ्यावा लागेल.

छिंदम याच्या घाणेरड्या वक्तव्यावरून राजकारण करण्याची ही अजिबात वेळ नाही, याची जाणीव सर्वांनाच आहे. तसेही शिवरायांच्या नावावरून या राज्यात जाती-धर्माचे राजकारण हे होतच असते. परंतु, छिंदम ही काही लोकांतील विकृती असून, ती विकृती आज ठळकपणे पुढे आली, अशा विकृतांच्या नांग्या वेळीच ठेचल्या नाही तर भविष्यात त्याचे दुष्पपरिणाम समाजाला भोगावे लागण्याची शक्यता आहे. म्हणून, छिंदमला या राज्यातून तातडीने तडीपार करावे, तो ज्या राज्यातून आला त्याच राज्यात त्याला परत पाठवले गेले पाहिजेत. कारण महाराष्ट्रात राहण्याची लायकीच हा माणूस गमावून बसला आहे. ज्या कुणाला शिवरायांबद्दल आदर नाही, त्यांनी खुशाल हे राज्य सोडावे, असे आमचे ठाम आणि अगदी निर्णायक असे मत आहे. या मताशी तडजोड होणे नाही. शिवराय हे रयतेचे राजे होते. शेतकर्‍यांच्या काडीलाही हात लावू नका, तेलासाठी उंदीर वाती पळवतील आणि शेतकर्‍यांच्या गंजी पेटतील तेव्हा डोळ्यात तेल घालून पहारा करा, असे आपल्या सैनिकांना ठणकावून सांगणारे ते खरेखुरे रयतेचे राजे होते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मातेसमान दर्जा देऊन तिचा सन्मान करणारे विशाल मनाचे राजे होते. अशा महान व्यक्तिमत्त्वाबद्दल जी गरळ ओकली गेली ती अक्षम्य आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात धर्म, जाती आणि संप्रदायाच्या नावाखाली तणाव भडकावण्याचे काम वारंवार झाले आहे. हा सगळा तमाशा राज्यातील जनता पाहतच आहे. परंतु, शिवरायांबद्दल जेव्हा घाणेरडी भाषा वापरली जाईल, तेव्हा कुणीही ती सहन करणार नाही. त्यासाठी संयमाचा बांध फुटलेला असेल अन् अगदी कच्चाबच्चादेखील आपला संताप व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही, ही अगदी अपेक्षित अशी प्रतिक्रिया आहे आणि ती उत्स्फूर्तपणेच घडून येईल.

राज्य सरकार या विकृत छिंदमबाबतीत निर्णय घेऊन ठोस कारवाई करेल, अशी अपेक्षा आम्ही ठेवत आहोत. शिवराय भलेही हिंदू होते. परंतु, ते मुस्लीमविरोधक नव्हते. त्यांनी स्वराज्यात कधीही धर्मभेद मानला नाही. त्यांचा सर्वाधिक विश्‍वास हा मुस्लिमांवरच होता. शिवरायांच्या सैन्यात आणि नौदलात एक तृतीयांश सैनिक हे मुस्लीम होते. एवढेच नव्हे तर नौदलाचा प्रमुख हा मुस्लीम होता. आगरा येथून सुटका करण्यासाठी शिवाजीराजांकरिता मुस्लीम सेवकांनीच जीवाची बाजी लावली होती. सांगायचे तात्पर्य काय? छिंदम जे बोलला ते जर एखाद्या मुस्लीम व्यक्तीच्या तोंडातून बाहेर पडले असते तर या राज्यात काय झाले असते? जातीयवादी लोकांनी दंगली भडकावल्या असत्या. छिंदम याच्याबद्दलही राज्यातील प्रत्येकाच्या मनात हाच रोष आहे. हा रोष प्रगट होण्यापूर्वीच छिंदम याच्याबद्दल सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने ठोस कृती करण्याची अपेक्षा आहे. केवळ छिंदम हा मूळचा स्वयंसेवक आहे किंवा भाजपचा पदाधिकारी होता म्हणून त्याला वाचवण्याचे काम सत्ताधारी पक्षाने करू नये. शिवराय ही प्रत्येकाची अस्मिता आहे. श्रीपाद छिंदम या विकृताने या अस्मितेला धक्का लावला आहे. त्याने प्रत्येकाचे मन दुखावले आहे.