छिंदम यांच्या वक्तव्याचा विधीमंडळात पडसाद

0

मुंबई । अहमदनगर महानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यात मोठे वादळ उठले होते. दरम्यान, बुधवारी 14 रोजी विधानपरिषदेतही याचे पडसाद उमटले. विरोधकांनी छिंदम यांच्यावर कारवाईची मागणी केली. या मागणीसाठी सभागृहात विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटे स्थगित करावे लागले. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी छिंदम याला सरकार पाठीशी घालत असून, त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे, असे आरोप केले. यावरून सभागृहात सरकार विरुद्ध विरोधी पक्ष अशी स्थिती निर्माण झाली.

सरकारची भूमिका
शिवजयंतीच्या दोन दिवसअगोदर नगर मनपाचे उपमहापौर छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली तसेच त्यांनी पदाचा राजीनामादेखील दिला आहे. पक्षाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देत सरकार छिंदमला पाठीशी घालत नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

पदोपदी अपमान
छत्रपतींच्या नावाने सत्तेत आलेल्या या सरकारने महाराजांचा पदोपदी अपमान करण्याचा काम केले आहे. श्रीपाद छिंदम हा भाजपचाच असून, त्यांनी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांना तुरुंगात टाकण्यात आले पाहिजे होते, अशी मागणी विरोधकांनी केली. शिवस्मारकाची उंची कमी केल्याने शासनाचा खरा चेहरा जनतेसमोर आले आहे.