पालघर। वाडा तालुक्यातील मनोर-वाडा रस्त्यावर असलेल्या छेडा स्पेशालिटी फूड प्रा.लि. कंपनीच्या प्रदूषणामुळे व सांडपाण्यामुळे अंभई गावातील तसेच परिसरातील शेतकरी व नागरिक हैराण झाले आहेत. या कंपनीशी ग्रामपंचायतीने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कंपनी व्यवस्थापन कुणालाही जुमानत नसल्याने ग्रामस्थांनी तहसीलदार, वाडा यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे. छेडा स्पेशालिटी फूड या कंपनीमध्ये केळींपासून आणि बटाट्यांपासून वेफर्स बनवले जातात तसेच अन्य खाण्यायोग्य चिवडे बनवले जातात. हे पदार्थ बनवताना कंपनीच्या धुरांड्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्याचबरोबर ही कंपनी अत्यंत दूषित पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये सोडते. हे पाणी केमिकलमिश्रित व दुर्गंधीयुक्त असते. या पाण्यामुळे परिसरातील शेतकर्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शेजारी असलेल्या विहिरींचे व बोअरवेलचे पाणीही केमिकलमिश्रित
शेजारी असलेल्या विहिरींचे व बोअरवेलचे पाणीही केमिकलमिश्रित बनले आहे. हे पाणी पिऊन परिसरातील गुरे आजारी पडत आहेत, तर सांडपाणी नाल्यात सोडल्याने मासे व अन्य प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. कंपनीपासून आजूबाजूचा अडीच कि.मी. परिसर पूर्णत: दूषित झाला आहे. या कंपनीपासून देहर्जे नदी दीड कि.मी.अंतरावर आहे. याच नदीमध्ये हे केमिकलमिश्रित पाणी वाहून जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीही दखल घेत नाही. कंपनीकडून बाहेर सोडले जाणारे सांडपाणी हे प्रक्रिया करून सोडले जावे तसेच कंपनीतील कचरा हा अंभई ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये टाकू नये, अशीही मागणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाने केली आहे.
जनतेच्या आरोग्यास धोका
दूषित पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. केळींची साली कुजल्याने मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरली आहे. केमिकलमिश्रित पाणी प्यायल्याने जनतेच्या व जनावरांच्या आरोग्यास धोका पोहोचला आहे. कंपनीतील प्लास्टिक व खराब झालेले खाण्याचे पदार्थ टाकल्याने परिसर प्रदूषित झाला आहे. कंपनीच्या प्रदूषणामुळे परिसरातील लोकांना श्वसनाचे त्रास झाले आहेत. त्यामुळे कंपनीवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.