छेड काढणार्‍या टवाळखोरांना विद्यार्थिनीच्या पालकांनीच पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन

0

बेंडाळे महाविद्यालयासमोरील प्रकार ः पोलिसांनी तरुणांना दाखविला खाकीचा हिसका


जळगाव: महाविद्यालयाच्या बाहेर पडल्यावर हातवारे, इशारे करुन दोन टवाळखोर विद्यार्थीनीची छेड काढत होते. यानंतरही विद्यार्थीनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने टवाळखोरा तरुणांनी विद्यार्थीनीचा घरापर्यंत पाठलाग केला. 10 ते 15 दिवसांपासूनच्या रोजच्या छेडखानीला कंटाळून विद्यार्थीनीने टवाळखोरांना अद्दल घडावी म्हणून गुरुवारी पालकांना थेट महाविद्यालयात बोलावून घेतले. पालकांनी छेड काढतांना रंगेहाथ दोघा टवाळखोरांना पकडले. यातील एकाला पकडून जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. एक झटापटीत पसार झाला होता, त्याला नंतर जिल्हापेठ पोलिसांनी घरुन ताब्यात घेवून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणले.

हातवारे, इशारे करुन मागत होते मोबाईल नंबर

शहरातील एका परिसरातील विद्यार्थीनी बेंडाळे महाविद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. विद्यार्थीनी महाविद्यालयात रिक्षाने ये-जा करते. जुने जळगाव तसेच कंजरवाडा येथील रहिवासी असलेले दोघे तरुण दहा ते पंधरा दिवसांपासून संबंधित विद्यार्थीनीची छेड काढत आहेत. महागड्या दुचाकीवरुन येवून महाविद्यालयाच्या बाहेर उभे राहत होते.

विद्यार्थीनी दिसली संबंधित टवाळखोर तिला हातवारे करुन इशारे करुन फोन नंबर मागत होते. तसेच गाडीवर बसण्याचेही इशारे करत होते. यादरम्यान अश्‍लिल हातवारेही या टवाळेखोरांनी केले. मात्र विद्यार्थीनीने भितीपोटी तसेच बदनामी होईल म्हणून हा प्रकार कुटुंबियांना सांगितला नाही. आणि महाविद्यालयातील शिक्षकांनाही सांगितला नाही.

मैत्रिणीकडून फोन नंबर मिळविण्याचा प्रयत्न

हातवारे, इशारे एवढ्यावरच तरुण थांबले नाहीत. या दोघां तरुणांनी संबंधित विद्यार्थीनीपर्यंत पोहचण्यासाठी विद्यार्थीनीच्या मैत्रिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. एकेदिवशी या तिच्या मैत्रिणीला थांबवून तरुणांनी स्वतः संपर्क क्रमांक विचारला. मात्र टवाळखोरांना अद्दल घडवावी म्हणून विद्यार्थीनीच्या मैत्रिणीचे स्वतः नव्हे तर थेट तिच्या भावाचा मोबाईल नंबर संबंधित तरुणांना देवून टाकला.

दुचाकीवरुन विद्यार्थिनीचा घरापर्यंत पाठलाग

दुचाकी घेवून रोज महाविद्यालयात बाहेर थांबून, हातवारे तसेच इशारे करुन विद्यार्थीनीने संबंधितांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही. विद्यार्थीनी प्रतिसाद देत नसल्याने पाहून संबंधित टवाळखोरांनी विद्यार्थीनी जात असलेल्या रिक्षाच्या तिच्या घरापर्यंंत दुचाकीने पाठलाग केला. रिक्षातून उतरल्यावरही तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. छेड काढणारे टवाळखोर घरापर्यंत पोहचल्याने विद्यार्थीनीच्या मनात भिती निर्माण झाली.

कंटाळलेल्या विद्यार्थिनीने पालकांनाच बोलावून घेतले

गुरुवारी नेहमीप्रमाणे विद्यार्थीनी बाहेर आल्यावर संबंधित टवाळखोरांनी नेहमीप्रमाणे छेड काढली. गेल्या काही दिवसांपासूनच्या प्रकाराला कंटाळलेल्या विद्यार्थीनीने संबंधित तरुणांला अद्दल घडवायचे ठरविले. तरुण छेड काढण्यात व्यस्त असतांना विद्यार्थीनीने महाविद्यालया बाहेर उभ्या एका नागरिकाला मोबाईलवरुन फोन करण्याची विनंती केली. फोन मिळाल्यावर विद्यार्थीनीने थेट तिच्या वडीलानांच प्रकार कथन करुन बोलावून घेतले. वडीलांनी महाविद्यालय गाठले. तरुण बसलेल्या दुचाकीची चाबी काढून घेतली. हाती लागलेल्या टवाळखोराना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जावून कर्मचार्‍यांच्या स्वाधीन केले. याठिकाणी पालकांनी मोबाईलमध्ये काढलेल्या छायाचित्रातील वर्णनानुसार गुन्हे शोध पथकातील पसार झालेल्या कंजरवाड्यातील तरुणाला ताब्यात घेत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी तक्रार न दिल्याने कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नाही.