छोटा राजन पहिल्यांदाच दोषी!

0

नवी दिल्ली । बनावट पासपोर्ट प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने हा निर्णय दिला आहे. दोषी ठरवलेले इतर तिघे हे पासपोर्ट कार्यालयाचे निवृत्त अधिकारी आहेत. छोटा राजनसह चौघांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. 70 पैकी अधिक खटल्यात आरोपी असलेल्या छोटा राजनविरोधातील हे पहिले प्रकरण असेल, ज्यावर कोर्ट त्याला शिक्षा सुनावणार आहे.

बनावट पासपोर्ट प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाने चौघांविरोधात भारतीय दंडविधान कलम 420, 468, 471, 120बी, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत आरोप निश्‍चित केले आहेत. सध्या छोटा राजन न्यायालयीन कोठडीत असून तीन दोषी अधिकारी जामिनावर बाहेर आहेत. छोटा राजन याच्या नावावर खंडणी, तस्करी, अंमली पदार्थांची वाहतूक आणि खुनाचे एकुण 85 गुन्हे आहेत. 25 ऑक्टोबर 2015 मध्ये छोटा राजनला इंडोनेशियाच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला भारताच्या ताब्यात सोपविण्यात आले होते.

छोटा राजन याने या खटल्याच्या सुनावणीदरम्यान दहशतवाद्यांशी लढण्यासाठी मदत करत असल्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांनीच मला बनावट पासपोर्ट तयार करून दिल्याचा दावा केला होता. 16 वर्षांपूर्वी दाऊदने मला बँकॉकमध्ये असताना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारतीय सुरक्षा यंत्रणांनीच मला मोहन कुमार या बनावट नावाने पासपोर्ट तयार करून दिल्याचे राजनने म्हटले होते. मी भारताच्या दहशतवादीविरोधी लढ्याचा आणि निष्पाप नागरिकांना मारणार्‍या देशविरोधी घटकांविरुद्धच्या लढाईचा एक भाग होतो. मला मदत केलेल्या आणि देशाच्या भल्यासाठी मी मदत केलेल्या लोकांची नावे सांगू शकत नाही, असेही छोटा राजनने सांगितले होते.