छोटी कल्पना…मोठे समाधान

0

मी शाळेत असताना, माझ्या वर्गात असणारे माझे काही गरीब आणि स्लम एरियात राहणारे मित्र. पहाटे पाच वाजता उठून, आमच्या इथे असणार्‍या एका बेकरीमधून. ताजे.. पाव, बनपाव, खारी, टोस्ट, हे पदार्थ ट्रेमध्ये डोक्यावर घेऊन घरोघरी विकत फिरत असायचे. त्यांना पाहून मला खरोखर त्यांची फार किव यायची. पण करता काय, गरिबी खूप वाईट हो ! त्याकाळी..आमची म्हणावी इतकी गरिब परिस्थिती नव्हती. पण, गरिबी भोगताना नेमका काय त्रास होतो. ते पाहण्यासाठी म्हणून. आठवी-नववीत असताना, एक अनुभव म्हणून मी महिन्याला फक्त शंभर रुपयांप्रमाणे घरोघरी फिरून वर्तमानपत्र सुद्धा टाकली आहेत. त्यावेळी.. स्वतःला उच्चभ्रू आणि अतिशहाणे म्हणवणार्‍या लोकांची विविध विकृत रूपं मला पाहायला मिळाली. मी सुद्धा पहाटे साडेपाच वाजता, मला टाकायचे असणारे पेपर, माझ्या ताब्यात घ्यायचो. आणि सकाळी दहा वाजेपर्यंत, पंधरा एक किलोमीटर सायकल चालवून हे काम मी संपवायचो. तर.. पेपर टाकायला गेल्यावर त्या लोकांचे फार नखरे असायचे. “पेपर आमच्या दाराच्या कडीला लाऊन जात जाऊ नकोस, दार वाजवून आम्ही येईपर्यंत वाट पाहत जा, कडीला लावलेला पेपर कोणीतरी चोरून नेतं. समजलं का तुला..? ए बाबा.. तो पेपर तू तिसर्‍या मजल्यावर स्वतः घेऊन येत जा, तू तो पेपर खालूनच वर फेकतोस? पावसाळ्यात आमचा पेपर भिजतो रे बाबा. आणि, तुला नसेल जमत तर उद्यापासून बंद कर” एकदा तर.. एक बाई मला म्हणाली होती. काल पेपर टाकायला आल्यावर आमच्या दरवाजातील चप्पल तू घेऊन गेला आहेस.

एक नाही, शंभर लफडी.. असो. आता, माझ्या घरी सुद्धा पेपर येत असतो. आणि, मी सुद्धा नेमका दुसर्‍या मजल्यावर राहायला आहे. साहजिकच माझ्याकडे पेपर टाकायला येणार्‍या मुलाला त्याचा त्रास होत होता. तो बिचारा.. रोज सकाळी, दोन जिने चढून वरती यायचा. आणि आमच्या घराच्या कडीला पेपर लाऊन निघून जायचा. नंतर, तो सुद्धा थकला. आणि त्याने माझा पेपर माझ्या पार्किंग मध्ये टाकायला सुरवात केली. साहजिक आहे, पार्किंग मध्ये पेपर पडल्याने, कधी तो ओला व्हायचा, तर कधी मोकाट कुत्रे त्याला फाडून टाकायचे. याबद्धल, मी त्या मुलाला कधीच टोकलं नाही. कारण, या सगळ्या चक्रातून मी स्वतः सुद्धा गेलेलो आहे.यावर काहीतरी उपाययोजना आणावी. असं मला वाटू लागलं. आणि… त्यावेळीही सुपीक कल्पना माझ्या डोक्यात आली. शीतपेयाच्या दोन लिटरच्या प्लास्टिकच्या बाटलीला चित्रात दाखवल्याप्रमाणे कापून घेऊन. मी ती माझ्या बिल्डींगच्या गेटला लाऊन टाकली. आता तो मुलगा माझा पेपर या बाटलीत ठेवत असतो.

असा त्रास तुम्हाला होत असेल, तर तुम्ही सुद्धा अशी एक बाटली, तुमच्या बिल्डिंगच्या गेटला लाऊन टाका. तो पेपर टाकणारा मुलगा आपला पेपर या बाटलीत टाकून जाईल. यामुळे, पेपर सुद्धा खराब होणार नाहीत. आणि त्याला होणारा त्रास सुद्धा वाचेल. ही उपाययोजना अमलात आणल्यास, कोणाचा तरी त्रास कमी केल्याचं. मानसिक समाधान सुद्धा तुम्हाला नक्कीच लाभेल.

– पांडुरंग कुंभार
9595662687