पल्लेकेले । श्रीलंकेवर तिसर्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवित मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रीकेट संघाचा कर्णधार विराट कोहली संघाच्या कामगिरीवर खुश आहे. कोहली सामन्यानंतर म्हणाला की, छोटे लक्ष्य हे आव्हानात्मकच असते. कोहली म्हणाला की, दुसर्या एकदिवसीय सामन्याप्रमाणेच तिसर्या सामन्यातही आघाडीची फलंदाजी ढेपाळली. मात्र, मधळ्या आणि शेवटच्या फलंदाजांनी या संधीचा फायदा घेतला. रोहितने शानदार शतक केले, तर महेंद्रसिंग धोनीनेही सर्वोत्कृष्ट खेळी केली. गोलंदाजीसाठी धावपट्टी अनुकूल असल्याने फलंदाज बाद होत गेले, असे त्याने सांगितले. बुमराहची स्तुती करत कोहल म्हणाला, बुमराहने मालिकेत आतापर्यंत 3 सामन्यात एकूण 11 विकेट घेतल्या आहेत. तो सध्या उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. मागील सामन्यात पाच विकेट घेण्याची त्याची संधी हुकली. मात्र, या सामन्यात तो यशस्वी ठरला.
कर्णधार विराट कोहलीचे मत
एकदिवसीय आणि टी-20 सामन्यातील तो सर्वोत्कृष्ट गोलंदाजापैकी एक आहे. तिसर्या एकदिवसीय सामन्यात बुमराहने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत पहिल्यांदा 5 विकेट घेतल्या. बुमराहने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे भारत श्रीलंकेला फक्त 217 धावांवर रोखू शकला होता. तिसरा एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेवर 6 विकेटने मात करत मालिका जिंकली आहे. या विजयासह भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.