‘छोडो भारत’ चळवळीची 75 वर्षे

0

‘छोडो भारत ’ संपूर्ण देशातून मग हाच निर्णायक नारा घुमू लागला. संपूर्ण देशवासीयांच्या ’ आतल्या आवाजा ’ला जणू शब्दरूप मिळालं. इंग्रजांचं आसन या ’आवाजा’नं डळमळीत केलं.

9 ऑगस्ट 2017
पूर्ण 75 वर्षे होतील या जाज्वल इतिहासाला. इतिहासाचं स्मरण करायचंच, तर अशा इतिहासाचं करायला हवं.

हा देश जेव्हा एका आवाजात बोलू लागला, त्या पर्वाचं, त्या घोषणेचं स्मरण करायला हवं. आजच्या पिढीला त्याची जाणीव करून द्यायला हवी. देशातील आजची परिस्थिती पाहता जनतेचा हा आवाज पुन्हा एकदा घुमायला हवा. देश भेद या सांप्रदायिक, भांडवलधार्जिण्या दलाल आणि देशविघातक फुटीर शक्तींना पुन्हा त्याच निर्धारानं सांगायला हवं, चले जाव.

कारण, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील लढवय्यांचे, त्या लढ्याचे आपणच तर वारस आहोत. 9 ऑगस्टच्या ’भारत छोडो ’घोषणेनंतर देशभरात झालेल्या प्रतिकारामध्ये समाजवादी आणि राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचा सर्वात मोठा कृतिशील सहभाग होता. समाजवादी नेते अच्युतराव पटवर्धन, युसूफ मेहेरअली, जय प्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, अरुणा असफअली, उषा मेहता, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, साने गुरुजी, सेनापती बापट, शिरूभाऊ लिमये आदी नेत्यांसह हजारो सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी भूमिगत राहून, संघर्ष करीत ऑगस्ट क्रांतीत भाग घेतला. याच आंदोलनात नंदुरबारच्या शिरीषकुमार व त्याच्या सहकार्‍यांनी नंदुरबारच्या माणिक चौकात 9 सप्टेंबर 1942 रोजी तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न केला असताना शिरीषकुमारसहित 4 राष्ट्र सेवा दल सैनिक शहीद झाले.

नंदुरबारपासून 60 कि.मी.च्या सातपुड्याच्या पर्वतराजीतील ’रावळपाणी’ गावी शेकडो आदिवासींनी भाग घेतला असता त्यात इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात 20 ते 25 आदिवासी शहीद झाले होते. समाजवादी नेत्यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट क्रांती पर्वाची ज्वाला देशभर पसरली. सातारा (महाराष्ट्र), मिदनापूर(बंगाल) आणि बालिया (उत्तर प्रदेश) येथे प्रतिसरकार चालवून स्थानिक जनतेने इंग्रजांची सत्ता धुडकावून लावली, महाराष्ट्रातील सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली पत्री सरकारने हे आंदोलन धगधगत ठेवले होते.

येत्या 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती पर्वाला 75 वर्षे पूर्ण होताहेत. अमेरिकेत ट्रम्प, इंग्लंडमध्ये ब्रेक्झिट, सीरिया व इराकच्या काही भागांत युद्धाचे सावट आले आहे. जगभर अस्वस्थता आहे. भारतात काश्मीर, तथाकथित रेड कॉरिडॉर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, तामीळनाडू येथील शेतकरी ’करो वा मरो’च्या स्थितीत आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी तर संपाचे हत्यार उपसले होते. शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. गरिबाच्या बाजूने लढणार्‍यांना देशद्रोही ठरवले जात आहे.

स्वातंत्र्याच्या कुठल्याही आंदोलनात नसलेले आता देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटत आहेत. देशभर असहिष्णुतेचे वातावरण वाढत चालले आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे. दलित, अल्पसंख्याक यांच्यावर हल्ले सुरू आहेत. देशात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे, अशा स्थितीत पुन्हा एकदा या जातीयवादी, धर्मांध, फुटीरवादी शक्तींना सांगायला हवं ’चले जाव’ राष्ट्र सेवा दलाने त्यासाठी 1 ऑगस्टपासून रावळपाणी, नंदुरबारपासून मुंबईपर्यंत 1 ऑगस्ट क्रांती यात्रा काढली आहे, तर दुसरी यात्रा क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सांगली येथील घरापासून निघणार आहे. या दोन्ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी मुंबईत येणार आहेत.

सकाळी गिरगाव चौपाटी ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत डॉ. जी. जी. पारिख यांच्या नेतृत्वाखाली एक ’शांती मार्च’ गेली कित्येक वर्षे निघत आहे. या शांती मार्चमध्ये ही सेवा दलाची जागर यात्रा विलीन होणार आहे. या शांती मार्चमध्ये या वेळी देशभरातील साहित्य, सांस्कृतिक, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी सहभागी होत आहे. राष्ट्र सेवा दलासह समाजवादी परिवारातील हम समाजवादी मंचासह अनेक संस्था, संघटनांनी यात पुढाकार घेतला आहे.आपणही यात सामील होऊ या.
शरद कदम – 9224576702